पुढील वर्षी म्हणजे 2023 पर्यंत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या (Most Populated Country) असलेला देश बनेल. याबाबतीत भारत पुढील वर्षी चीनला (China) मागे टाकेल असा अंदाज आहे. संयुक्त राष्ट्राने (UN) जारी केलेल्या एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की 2023 पर्यंत भारत लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकेल. संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या विभागाच्या आर्थिक आणि सामाजिक व्यवहार विभागाच्या 'वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट 2022' शीर्षकाच्या अहवालात माहिती देण्यात आली आहे की, 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत जागतिक लोकसंख्या आठ अब्जांच्या आकड्यापर्यंत पोहोचेल.
परंतु, जागतिक लोकसंख्या 1950 पासून सर्वात कमी वेगाने वाढत आहे आणि 2020 मध्ये ती एक टक्क्यांहून कमी झाली आहे. युएन च्या ताज्या अंदाजानुसार जगाची लोकसंख्या 2030 मध्ये 8.5 अब्ज आणि 2050 मध्ये 9.7 अब्ज पर्यंत वाढू शकते. अंदाजे 10.4 अब्ज लोकसंख्येसह 2080 मध्ये ती शिखरावर जाण्याचा अंदाज आहे आणि 2100 पर्यंत त्याच पातळीवर राहील.
अहवालानुसार, 2022 मध्ये जगातील दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेले क्षेत्र पूर्व आणि दक्षिण-पूर्व आशिया होते, ज्यात 2.3 अब्ज लोक होते, जे जागतिक लोकसंख्येच्या 29 टक्के प्रतिनिधित्व करतात. त्याच वेळी, मध्य आणि दक्षिण आशियाची लोकसंख्या 2.1 अब्ज आहे, जी एकूण जागतिक लोकसंख्येच्या 26 टक्के आहे. या प्रदेशांमध्ये चीन आणि भारत हे सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहेत. 2022 मध्ये या दोन देशांची लोकसंख्या 1.4 अब्जांपेक्षा जास्त आहे. (हेही वाचा: गुजरातमध्ये रंगला बनावट आयपीएलचा डाव; भाड्याने घेतलेल्या शेतात मजुरांना खेळवले; रशियन लोकांनी लावला सट्टा)
अहवालानुसार, 2022 मध्ये भारताची लोकसंख्या 1.412 अब्ज आहे, तर चीनची लोकसंख्या 1.426 अब्ज आहे. भारत 2023 पर्यंत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून चीनला मागे टाकेल आणि 2050 मध्ये देशाची लोकसंख्या अंदाजे 1.668 अब्ज असेल. त्यावेळी चीनची लोकसंख्या 1.317 अब्ज असेल.