Fake IPL in Gujarat: गुजरातमध्ये रंगला बनावट आयपीएलचा डाव; भाड्याने घेतलेल्या शेतात मजुरांना खेळवले; रशियन लोकांनी लावला सट्टा
Gully cricket being played in Gujarat. Credits: Wikimedia Commons

आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या खेळाच्या सामन्यांमध्ये तसेच आयपीएलसारख्या (IPL) क्रिकेट सामन्यांमध्ये सट्टेबाजीच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या आणि ऐकल्या असतील. पण, आता गुजरातमध्ये (Gujarat) अशी आयपीएल बाबतची एक मोठी फसवणूक उघडकीस आली आहे. या ठिकाणी चक्क बनावट आयपीएल (Fake IPL) सुरू होते. गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील वडनगरमध्ये सुरू असलेल्या या बनावट आयपीएलमध्ये रशियातील लोकही बेटिंगच्या जाळ्यात अडकले होते. आता पोलिसांनी याचा खुलासा करत 4 जणांना अटक केली आहे.

ही बनावट क्रिकेट लीग आयोजित करण्यासाठी एक मोठे शेत भाड्याने घेण्यात आले होते. मजुरांना सामना खेळण्यासाठी प्रति सामना 400 रुपये देण्यात आले होते. सामन्यादरम्यान मजुरांना जर्सी घालून मैदानात उतरवले जात होते आणि बनावट पंचही ठेवण्यात आले होते, जे संपूर्ण सामने खेळवत होते. महत्वाचे म्हणजे सामन्यादरम्यान मागून ऑडिओ इफेक्टही वाजवले जात होते. एकंदरीत हा खरा आयपीएल चालू आहे असे लोकांना वाटावे असा पूर्ण प्रयत्न केला होता.

या बनावट आयपीएल सामन्याचे चित्रीकरण करण्यासाठी एचडी कॅमेरे बसवण्यात आले होते आणि सामन्यांचे यूट्यूबवर थेट प्रक्षेपण केले जात होते. पोलिसांनी सांगितले की, शोएब दावडा नावाच्या व्यक्तीने सट्टेबाजीसाठी संपूर्ण खेळाचे मैदान तयार केले होते आणि 20-20 षटकांचा सामना खेळवला जात होता. सामना खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना कसे खेळायचे, कधी आऊट व्हायचे आणि कधी गोल करायचे याच्या आधीच सूचना देण्यात आल्या होत्या. (हेही वाचा: भारत आणि इंग्लंड आता एकदिवसीय सामन्यात आमनेसामने, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहणार सामना)

गुजरातमध्ये सुरू असलेल्या या बनावट आयपीएलचे तार रशियाशी संबंधित असून ठगांनी रशियातील ट्व्हर, वोरोनेझ आणि मॉस्को या तीन शहरातील लोकांना आपल्या जाळ्यात अडकवल्याची माहिती समोर आली आहे. सट्टेबाजीसाठी प्रसिद्ध रशियन पबमध्ये आठ महिने काम करून मोलीपूरला परतलेल्या शोएब दावडा याने ही फसवणूक केली. मेहसाणा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त केले असून आतापर्यंत घटनास्थळावरून 3 लाख रुपयांसह 4 जणांना अटक केली आहे. या बेटिंगमध्ये कोणत्याही आंतरराष्ट्रीय रॅकेटचे नाव येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.