प्रदूषणामुळे आयुष्य कमी झाल्याचे दाखले भारतीय अभ्यासात नाहीत: प्रकाश जावडेकर
Prakash Javadekar (Photo Credits: PTI)

दिल्ली (Delhi) पासून दक्षिण भारतापर्यंत अनेक शहरांमध्ये प्रदूषणाचे भीषण पडसाद उमटू लागले असताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) यांनी लोकसभेत (Loksabha)  भाषण देत असताना एक वेगळीच माहिती समोर आणली. भारतीय अभ्यासात आजवर कुठेही प्रदूषणामुळे आयुष्य घातल्याचे दाखले दिसत नाहीत त्यामुळे हा दावा केवळ अफवा आहे जो कोणीही पसरवून लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे असे जावडेकर यांनी म्हंटले आहे. तसेच लोकांची मानसिकता भीतीने भरून टाकू नका असा इशाराही जावडेकर यांनी दिला.

आज, लोकसभेत, प्रश्नांचे सत्र सुरु असताना जावडेकर यांनी प्रदूषणाच्या मुद्द्याला हात घालत देशातील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून या प्रयत्नांना अनेक ठिकाणी चांगले प्रतिसाद मिळत आहेत असे सांगितले. यांनतर त्यांनी एका परदेशी अभ्यासाचा दाखला देताना प्रदूषणाने आयुर्मान घटते का या प्रश्नावरही भाष्य केले. प्रदूषण आणि आयुर्मान यांचा परस्पर संबंध असल्याचे कोणत्याही अभ्यासात दिसून येत नाही, शिवाय काही अभ्यासक जरी याच्या विरुद्ध माहिती देत असले तरी हे सर्वेक्षण वेगळ्या पिढीशी संबंधित असण्याची शक्यता आहे असे मत देखील जावडेकर यांनी मांडले.

दरम्यान, सरकार प्रदूषणासाठी अनेक पाऊले उचलताना दिसून आले आहे, विद्युत वाहनांच्या वापरावर दिला जाणारा जोर, केंद्र सरकारचा नॅशनल क्लीन एयर प्रोग्राम (NCAP), या मार्फत हवेचा दर्जा सुधारवण्यासाठी पाऊलं उचलली जात आहेत. जावडेकर यांच्या माहितीनुसार, NCAP अंतर्गत 102 शहरांसाठी वेगवेगळे प्लॅन्स आखण्यात आले आहेत, ज्यासाठी 11,254 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. तूर्तास जावडेकर यांच्या या दाव्यावर सोशल मीडियावरून विरुद्ध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.