पंतप्रधान नरेंद्र मोदी

आज देशातील वंचित व मागासवर्गातील जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या पीएम-सुरज पोर्टलचे (PM Suraj Portal) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी, वंचित व मागास घटकांचा विकास झाल्याशिवाय देश विकसित होणार नाही. त्यामुळे देशातील वंचित आणि मागास घटकांच्या विकासावर केंद्र सरकार भर देत असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

पीएम-सुरजच्या माध्यमातून वंचित आणि मागासवर्ग घटकांसाठी आर्थिक सहायता तसेच उद्योगांसाठीचे कर्ज सहज उपलब्ध होणार असल्याचे सांगून पीएम मोदी म्हणाले, सरकारने 2047 पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. देशातील सफाई कामगारांच्या आरोग्यासाठीही केंद्र सरकार काम करत असून त्यांना आज पीपीई किट वाटप करण्यात येत आहेत. तसेच त्यांना आयुष्मान भारत (आभा) कार्ड देण्यात येत आहे. आभा कार्डच्या माध्यमातून त्यांना 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत.

'पीएम-सूरज' पोर्टलच्या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. पोर्टल सुरू झाल्यानंतर, मोठ्या संख्येने लोक त्यात सामील होतील आणि त्याचा लाभ घेतील. समाजातील सर्वात वंचित घटकांचे उत्थान करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. प्रधानमंत्री मोदी म्हणाले की, एससी, एसटी आणि ओबीसी समुदायांना सक्षम करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. एससी, एसटी आणि ओबीसी तरुणांसाठी शिष्यवृत्तीत वाढ, वैद्यकीय जागांच्या अखिल भारतीय कोट्यामध्ये ओबीसींसाठी 27 टक्के जागांचे आरक्षण तसेच नीट परीक्षेत ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रवेश आणि वंचित समुदायातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे विद्यार्थ्यांना विज्ञानाशी संबंधित विषयात पीएचडी करता यावी यासाठी नॅशनल फेलोशिपची रक्कमही वाढवण्यात आली आहे. (हेही वाचा: भारतीय रेल्वेमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी; RRB मागवले 9,144 पदांसाठी अर्ज, जाणून घ्या पात्रता व निवड प्रक्रिया)

यावेळी देशातील 1 लाख लाभार्थ्यांना पीएम सूरजच्या माध्यमातून 720 कोटी रूपयाचे अर्थसहाय्य थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ (NBCFDC), राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (NSFDC) आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ (NSKFDC) या तीन राष्ट्रीय महामंडळामार्फत देशातील सर्व राज्यातील अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग व सफाई कर्मचारी यांना अर्थसहाय्य करण्यासाठी सूरज पोर्टल सुरू करण्यात आले आहे. समाजातील सर्वात उपेक्षित घटकांचे उत्थान करणे हे या पोर्टलचे उद्दिष्ट आहे.