भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज संध्याकाळी सहा वाजता भारतीयांना संबोधित करणार आहेत. ट्वीटरच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी त्याची माहिती देताना सार्यांनी सहभागी होण्याचे देखील आवाहन केले आहे. भारतामध्ये कोरोना वायरसचं संकट थोडं निवळताना दिसत असल्याने हा दिलासा असला तरीही 17 ऑक्टोबर पासून घटस्थापना करून देशात पुढील 3 महिन्यांचा मोठा सणासुदीचा काळ सुरू होत आहे. सोबतच आता वातावरणात बदल जाणवू लागले आहेत. त्यामुळे येणारा थंडीचा काळ, सणासुदीचा काळ यामध्ये नागरिक बेफिकीर झाले तर पुन्हा नियंत्रणात आलेला कोरोना डोकं वर काढू शकतो. त्यामुळे या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी भारतीयांना काय सल्ला देणार? तसेच आता देशात कोरोनाला रोखण्यासाठी कोविड 19 वरील संभाव्य लसीबाबत, लसीकरणाबाबत नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्याबद्दल मोदी माहिती देणार का? असा देखील कयास लावला जात आहे. भारतामध्ये COVID Immunisation च्या ट्रॅकिंगसाठी Digital Health ID चा वापर केला जाऊ शकतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संकेत; जाणून घ्या हेल्थ आयडी कार्ड नेमकं कशासाठी?
नरेंद्र मोदी ट्वीट
आज शाम 6 बजे राष्ट्र के नाम संदेश दूंगा। आप जरूर जुड़ें।
Will be sharing a message with my fellow citizens at 6 PM this evening.
— Narendra Modi (@narendramodi) October 20, 2020
दरम्यान युरोपामध्ये आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. युके, आयर्लंड, स्पेन, जर्मनीमध्ये खालावलेला कोरोनाबाधितांचा ट्रेंड पुन्हा उसळल्याने कोरोना लॉकडाऊन नवी नियमावली जारी करत नियम कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे भारताला पुन्हा लॉकडाऊन आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने मोदी त्याबद्दल सतर्क राहण्याचा सल्ला देण्याचीही शक्यता आहे.
भारतामध्ये आता सातत्याने कोरोनाबाधितांचा आकडा खालावत आहे. अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या कमी करत देशाचा कोविड 19 रिकव्हरी रेट सुधारण्याला भारताला यश आलं आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या समन्वयाने असेच काम सुरू राहिल्यास आणि नागरिकांनी काळजी घेतल्यास फेब्रुवारी 2021 मध्ये भारतामधील कोरोना व्हायरसच्या अॅक्टिव रुग्णांची संख्या कमी होऊन 40,000 हजारांवर येऊ शकते असा विश्वास देखील काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बोलून दाखवला आहे.