Narendra Modi On Rajkot Fort Incident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे आमच्यासाठी केवळ राष्ट्रपुरुष, महापुरुष नाहीत तर ते आराध्य दैवत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे काही घडले त्याबद्दल मी महाराजांच्या चरणी माथा ठेवतो आणि छत्रपती शिवराय आणि शिवभक्तांची माफी मागतो. जे घडलं ते दुर्दैवी आहे. ज्यामुळे मला प्रचंड वेदना झाल्या, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी माफी मागितली आहे. वाढवण बंदर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त पंतप्रधान आज (30 ऑगस्ट) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या सोहळ्यानिमित्त उपस्थितांना संबोधीत करताना त्यांनी हे उद्गार काढले. मालवण येथील राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse), या धक्कादायक प्रकाराबाबत पंतप्रधान काय बोलतात याबाबत उत्सुकता होती.

कारवाईबाबत मौन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याबद्दल माफी मागितली. मात्र, ही घटना कशी घडली, का घडली, आता पुढे काय करणार याबाबत माहिती अथवा स्पष्टीकरण देण्याबाबत मात्र त्यांनी मौन बाळगले. त्यामुळे या राजकोट किल्ल्ययावरील घटनेकडे केंद्र सरकार कोणत्या दृष्टीने पाहते याबाबत काहीही स्पष्ट झाले नाही. दरम्यान, याच वेळी पंतप्रधानांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुद्दा उपस्थित केला. माझ्यावरील संस्कार आहेत की, जेव्हा राष्ट्रपुरुषांबद्दल असे काही घडते त्या वेळी मी माफी मागतो. पण, महाराष्ट्रातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अनेकांनी अनुद्गार काढले. मात्र, त्याबद्दल कोणीही माफी मागीतली नाही. त्यांना त्याबद्दल माफी मागावीशी वाटत नाही. त्यांच्याबद्दल अनुद्गार काढणारे लोक कोर्टामध्ये खटले लढतात. पण माफी मागत नाहीत, असेही ते म्हणाले.

पंतप्रधानांकडून छत्रपती शवाजी महाराजांच्या मुद्द्याला जोडून सावरकरांचा विषय

'वाढवण बंदरामुळे महाराष्ट्राच्या विकासास चालना मिळेल'

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, वाढवण बंदर हे आगामी काळात विकासाचे नवे केंद्र म्हणून उदयास येईल. गेल्या एका दशकात, भारताच्या किनारपट्टीवरील विकासाला अभूतपूर्व गती मिळाली आहे. आम्ही आधुनिक बंदरे विकसित केली आहेत, जलमार्ग विकसित केले आहेत. या दिशेने लाखो आणि करोडो रुपयांची गुंतवणूक झाली आहे. खाजगी गुंतवणूक झाली आहे. त्याचा फायदा आपल्या तरुणांना मिळत आहे, आज संपूर्ण जगाचे लक्ष वाढवण बंदराकडे आहे. यामुळे या संपूर्ण प्रदेशाचे आर्थिक चित्र बदलेल. आगामी काळा महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर प्रगतीपथावर पोहोचलेला असेल, असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी व्यक्त केला. या वेळी त्यांनी राज्य सरकारने केलेल्या विविध कामाचेही विशेष कौतुक केले.