PM Modi (फोटो सौजन्य - ANI)

PM Modi to Visit Nagpur: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) या महिन्याच्या अखेरीस नागपूर (Nagpur) येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयाला भेट देऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू नववर्षाच्या (Hindu New Year 2025) पहिल्या दिवशी म्हणजेच 30 मार्च रोजी नागपूर दौऱ्यावर असणार आहेत. 30 मार्च रोजीच, पंतप्रधान मोदी नागपुरातील आरएसएस समर्थित उपक्रम माधव नेत्रालयाच्या भूमिपूजनाला उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान मोदी रेशम बाग येथील आरएसएसच्या हेडगेवार स्मृती भवनलाही भेट देऊ शकतात.

मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच एकाच मंचावर -

प्राप्त माहितीनुसार, माधव नेत्र रुग्णालयाच्या भूमिपूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत देखील उपस्थित राहणार आहेत. अयोध्येत राम मंदिराच्या अभिषेकानंतर, आरएसएस प्रमुख मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच एकाच मंचावर दिसणार आहेत. संघाचे हेडगेवार स्मृती भवन हे संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे विश्रांतीस्थान आहे, तर दीक्षाभूमी हे ते ठिकाण आहे जिथे डॉ. भीमराव आंबेडकर यांनी दीक्षा घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मार्च रोजी नागपूर दौऱ्यात या दोन्ही ठिकाणांना भेट देण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - भारतीय वंशाच्या NASA अंतराळवीर Sunita Williams यांना PM Narendra Modi यांचं खास पत्र; भारत भेटीचं आमंत्रण)

आरएसएसच्या स्थापनेचे 100 वे वर्ष सुरू -

दरम्यान, 27 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होतील. 27 सप्टेंबर 1925 रोजी विजयादशमीच्या दिवशी डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी याची स्थापना केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक हिंदू राष्ट्रवादी, निमलष्करी स्वयंसेवक संघटना आहे ज्याने भारताच्या सध्याच्या राजकारणावर व्यापक प्रभाव पाडला आहे. (हेही वाचा - PM Modi On Mahakumbh: महाकुंभ म्हणजे 'एकतेचा महायज्ञ'! पंतप्रधान मोदींनी टाकला भारताच्या आध्यात्मिक वारशावर प्रकाश)

देशातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या अनेक मोठ्या नेत्यांनी संघापासूनच आपले सार्वजनिक जीवन सुरू केले. संघ ही जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना असून संघटनेच्या स्वयंसेवकांची संख्या कोट्यवधींमध्ये आहे.