PM Modi-Pope Francis Meet: तब्बल 21 वर्षानंतर भारतीय पंतप्रधानांनी व्हॅटिकनमध्ये घेतली पोपशी भेट; जाणून घ्या पीएम नरेंद्र मोदी व पोप फ्रान्सिसमध्ये काय झाली चर्चा
PM Modi Pope Francis Meet (Photo Credit : Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज व्हॅटिकन सिटी (Vatican City) येथे कॅथोलिक ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च नेते पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी पोप फ्रान्सिस यांनादेखील भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे. पोप फ्रान्सिस यांनी हे निमंत्रण स्वीकारल्यास त्यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात पोप जॉन पॉल II यांनी 1999 मध्ये भारताला भेट दिली होती. व्हॅटिकनमध्ये पंतप्रधान मोदी आणि पोप फ्रान्सिस यांच्यात केवळ 20 मिनिटांची बैठक होणार होती, परंतु दोघांमधील चर्चा सुमारे तासभर चालली.

स्थानिक वेळेनुसार साडेआठ वाजता पंतप्रधान मोदी व्हॅटिकनच्या प्रांगणात पोहोचले, तिथे व्हॅटिकनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. पंतप्रधान मोदींसोबत आलेल्या शिष्टमंडळात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचाही समावेश होता. पंतप्रधान मोदींनी प्रथम पोप यांची एकांतात भेट घेतली आणि त्यानंतर शिष्टमंडळ पातळीवरील बैठकीला हजेरी लावली. पंतप्रधान मोदी आणि पोप फ्रान्सिस यांनी गरिबी निर्मूलन आणि हवामान बदल रोखण्यासारख्या उपायांवर चर्चा केली.

तत्पूर्वी, भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितले होते की, व्हॅटिकनने चर्चेसाठी कोणताही अजेंडा निश्चित केलेला नाही. माझा विश्वास आहे की अशीच परंपरा आहे की जेव्हा परम आदरणीय (पोप) यांच्याशी चर्चा केली जाते तेव्हा कोणताही अजेंडा नसतो आणि आम्ही त्याचा आदर करतो. इटलीचे पंतप्रधान मारियो द्रागी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी 29 ते 31 ऑक्टोबरदरम्यान रोम, इटली आणि व्हॅटिकन सिटीच्या दौऱ्यावर आहेत. (हेही वाचा: Rules Change From 1st November: येत्या 1 नोव्हेंबर पासून 'या' नियमात होणार बदल, जाणून घ्या अधिक)

ख्रिश्चन सर्वोच्च धर्मगुरू पोप यांना भेटणारे पंतप्रधान मोदी हे पाचवे भारतीय पंतप्रधान आहेत. यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, इंदरकुमार गुजराल आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी पोप यांची भेट घेतली आहे. 1999 मध्ये वाजपेयींनी पोप जॉन पॉल II यांची भेट घेतली होती, त्यानंतर आता 21 वर्षानंतर पीएम मोदी यांनी पोपची भेट घेतली.