राज्यसभेच्या निवृत्त सदस्यांच्या निरोप समारंभात पंतप्रधान मोदींनी सभागृहाला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, डॉ.मनमोहन सिंग यांनी दीर्घकाळ सभागृह आणि देशाला मार्गदर्शन केले आहे. यासाठी तो कायम स्मरणात राहील. देशासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. याआधी बुधवारी पीएम मोदींनी राज्यसभेत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 40 जागाही जिंकणे कठीण असल्याचा दावा त्यांनी केला होता. बुधवारी राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींच्या भाषणावरील आभार प्रस्तावाच्या निमित्ताने केलेल्या भाषणात पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका केली. पण आज राज्यसभेत बोलताना मोदींनी देशाचे माजी पंतप्रधान व काँग्रेसचे राज्यसभेतील ज्येष्ठ खासदार मनमोहन सिंग यांच्यासाठी गौरवोद्गार काढले.

पाहा पोस्ट -

राज्यसभेतील 56 खासदारांचा कार्यकाळ संपत असून त्यानिमित्ताने या खासदारांच्या आभार प्रदर्शनाची चर्चा राज्यसभेत पार पडली. या चर्चेमध्ये दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी कार्यकाळ संपणाऱ्या सदस्यांच्या बाबतीत आभारप्रदर्शन करताना आपली भूमिका मांडली. यावेळी मनमोहन सिंग यांच्याबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही महिन्यांपूर्वी घडलेल्या एका प्रसंगाचा उल्लेख केला.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंग व्हीलचेअरवर बसून राज्यसभेत आले त्या प्रसंगाचा उल्लेख केला. “लोकसभेत काही दिवसांपूर्वी मतदानाचा एक प्रसंग होता. कशासाही हे मला आठवत नाही. हे स्पष्ट होतं की या मतदानानंतर विजय सत्ताधाऱ्यांचा होणार आहे. बाजूने व विरोधात असणाऱ्या मतांमध्ये अंतर खूप होतं. पण डॉ. मनमोहन सिंग व्हीलचेअरवर आले, मतदान केलं. एक खासदार आपल्या जबाबदाऱ्यांसाठी किती जागृत आहे याचं हे प्रेरणादायी उदाहरण होतं. असे त्यांनी म्हटले.