PM Cares Fund: ‘कोरोना व्हायरस’विरुद्धच्या लढ्यासाठी 'पीएम केअर फंड'मधून मिळाले 3100 कोटी; व्हेंटिलेटर खरेदीसह कामगारांना मिळणार लाभ
File image of PM Narendra Modi (Photo Credits: PIB)

गेले दोन महिने भारत कोरोना व्हायरस (Coronavirus) विरुद्धची लढाई लढत आहे. यासाठी विविध प्रकारे अनेक उपययोजना राबवल्या जात आहेत, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसाही खर्च होत आहे. देशातील बऱ्याच लोकांनी पीएम केअर फंड (PM Cares Fund), सीएम केअर फंडसाठी मदत केली आहे. आता पीएम केअर फंड ट्रस्टने कोविड-19 विरुद्ध लढण्यासाठी 3100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने (Prime Minister's Office) याची माहिती दिली आहे. देशावर कोरोना विषाणूचे संकट आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पीएम केअर फंड सुरू केला होता आणि यासाठी लोकांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते.

पंतप्रधान कार्यालयाने या 3100 कोटी रुपयांचे विभाजनही सांगितले आहे. त्यानुसार, 3100 कोटींपैकी अंदाजे 2000 कोटी रुपये व्हेंटिलेटर खरेदीसाठी, 1000 कोटी प्रवासी कामगारांच्या देखभालीसाठी आणि 100 कोटी रुपये लस विकसित करण्यासाठी मदत म्हणून दिले जाणार आहेत.

एएनआय ट्वीट-

28 मार्च रोजी पंतप्रधान मोदींनी कोरोनाविरूद्ध युद्धासाठी पीएम-केअर फंडाची स्थापना केली. लोकांनी यासाठी मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले होते. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, 'कोविड-19 विरूद्ध लढा देण्यासाठी देशभरातील लोकांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. या भावनेचा आदर ठेऊन  Prime Minister’s Citizen Assistance and Relief in Emergency Situations Fund ची स्थापना केली गेली आहे. एक सुधृढ भारत घडविण्यात याची मदत होईल. तरी, माझे लोकांचे आवाहन आहे की त्यांनी कृपया पीएम केअर फंडामध्ये योगदान देण्यासाठी पुढे यावे. देशावर कोणताही आपत्ती आल्यास याचा उपयोग केला जाऊ शकतो.'

(हेही वाचा: MSME सेक्टरला कोणत्याही गॅरेंटीशिवाय मिळणार 3 कोटी रुपयांचे कर्ज- अर्थमंत्री निर्मला सीतारामण)

दरम्यान, कोरोना संकटाकाळात तयार करण्यात आलेल्या पीएम केअर फंड आणि मोदी सरकारवर विरोधक हल्ला करत आहेत. त्याचे ऑडिट करण्याची मागणीही कॉंग्रेसकडून केली जात आहे. अशात आता पंतप्रधान कार्यालयाकडून पीएम केअर फंडाचे पैसे वाटपाची माहिती देण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री आठ वाजता देशाला संबोधित करत दिलेल्या भाषणात, कोरोना विषाणूमुळे होणारी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी देशाला 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या पॅकेजचे स्वरूप समजावून सांगितले.