पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत (PM Narendra Modi) एक मोठी माहिती समोर आली आहे. एनआयएच्या (NIA) मुंबई शाखेला एक मेल आला आहे ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येबद्दल लिहिले आहे. या ईमेलचा तपास एनआयएकडे देण्यात आला आहे. 20 किलो आरडीएक्ससह पीएम मोदी यांच्या हत्येचा कट स्लीपर सेलच्या माध्यमातून रचला जात असल्याचा दावा मेलमध्ये करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे की, आपला नापाक हेतू पूर्ण करण्यासाठी दहशतवादी संघटनांनी 20 स्लीपर सेल तयार केले आहेत.
मेलमध्ये दावा करण्यात आला आहे की, दहशतवाद्यांना आरडीएक्स सहज प्राप्त झाले असून 20 किलो आरडीएक्सची व्यवस्था करण्यात आली आहे. मेलमध्ये 2 कोटी लोकांना मारण्याचाही दावा करण्यात आला आहे. हा मेल नक्की कुठून पाठवला गेला आहे, तसेच त्यात कितपत सत्यता आहे याचा तपास आता तपास यंत्रणा करत आहेत. अशी माहिती मिळाल्यानंतर कोणतीही हलगर्जीपणा केला जाणार नसल्याचे एजन्सींचे म्हणणे आहे.
या कटाचा पर्दाफाश होऊ नये म्हणून आपण आत्महत्या करत असल्याचे ई-मेलरने म्हटले आहे. दरम्यान, एनआयएने गुरुवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या लष्कर-ए-तैयबाशी संबंधित ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) च्या चार वाँटेड दहशतवाद्यांविरुद्ध प्रत्येकी 10 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. तपास यंत्रणेच्या प्रवक्त्याने सांगितले की, या चार दहशतवाद्यांपैकी दोन पाकिस्तानी नागरिक आहेत. (हेही वाचा: परीक्षा हा जीवनातला एक महत्वपूर्ण भाग असून परीक्षा काळात मनात कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नका पंतप्रधान नरेंद्र मोदी)
केंद्रशासित प्रदेश आणि उर्वरित भारतामध्ये हिंसक कारवायांसाठी जम्मू आणि काश्मीरमधील तरुणांना कट्टरपंथी बनविण्याच्या आणि त्यांची भरती करण्याच्या कटाच्या संदर्भात गेल्या वर्षी नोंदवल्या गेलेल्या एका प्रकरणात, एनआयएला हे चौघे हवे आहेत. दुसरीकडे 19 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील सीमापुरी येथील एका घरातून आयईडी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.