Subramanian Swamy |(Photo Credits: Facebook)

भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी सोशल मीडियावर मोठा दावा केला आहे. स्वामींनी ट्वीट केले आहे की, वॉशिंग्टन पोस्ट आणि लंडन गार्डियन आज संध्याकाळी एक अहवाल प्रकाशित करणार आहेत अशी अफवा पसरली आहे. या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, मोदी सरकारचे कॅबिनेट मंत्री, आरएसएस नेते, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आणि पत्रकारांचे कॉल टॅप केले गेले आहेत. यासाठी पेगॅसस (Pegasus) या इस्रायली कंपनीशी करार करण्यात आला होता. या वृत्ताची पुष्टी झाल्यास त्याबाबतची माहिती शेअर करेन.

स्वामींच्या ट्विटनंतर टीएमसीचे खासदार डेरेक ओ ब्रायन म्हणाले की, या फोन टॅपिंगमध्ये बरेच विरोधी नेते निशाण्यावर आहेत. दुसरीकडे पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम म्हणाले की, माझ्या माहितीनुसार पेगॅससचा खुलासा खूप मोठा होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार शीला भट्ट यांनीही शनिवारी रात्री ट्विट करुन असाच दावा केला होता की, भारतासह जगातील विविध देशांशी संबंधित एक मोठी बातमी ब्रेक होणार आहे.

2019 मध्ये जेव्हा पेगॅसस बाबत बातमी आली होती तेव्हा आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांनी संसदेत सांगितले होते की, भारतात पेगॅससद्वारे कोणतीही अनधिकृत कृती आढळली नाही. इस्रायली सॉफ्टवेअर पेगॅसस हेरगिरीसाठी जगभरात वापरले जात आहे. भारतातही काही काळापूर्वी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे टॅप  करण्यासाठी त्याचा वापर केल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यावेळी उद्भवलेल्या वादावर, कंपनीने त्यांचे सॉफ्टवेअर केवळ सरकारी वापरासाठी असल्याचे स्पष्ट केले होते. (हेही वाचा: BS Yeddyurappa: कर्नाटकमध्ये नेतृत्वबदलाची चर्चा, मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला उधान)

2019 मध्ये व्हॉट्सअ‍ॅपच्या वतीने म्हटले गेले होते की, ते इस्त्रायली कंपनीविरूद्ध गुन्हा दाखल करीत आहे कारण या माध्यमातून 1400 लोकांच्या फोनवरून त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपची माहिती हॅक करण्यात आली आहे. अनेक भारतीय लोकांची नावेही सामील असल्याचा आरोप होता. या अहवालानुसार, पेगॅससने भारतातील अनेक बुद्धिवंत, वकील, दलित कार्यकर्ते, पत्रकार यांची माहिती हॅक केली होती. या घटनेनंतर आता सुमारे दीड वर्षानंतर इस्रायलची कंपनी पेगॅसस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.