राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांनी 'सत्यमेव जयते' (Satyamev Jayate) असे सूचक ट्विट केले आहे. सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Case) आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर काही काळातच पार्थ पवार यांनी ट्विट केले आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात पार्थ पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी जाहीरपणे तीव्र शब्दांत फटकारले होते. त्यामुळे पार्थ यांच्या या नव्या ट्विटला राजकीय अंगाने पाहिले जात आहे.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय द्वारे करवा असे पत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे दिले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमं आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली. पार्थ पवार यांच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची मोठी कोंडी होत होती. दरम्यान, प्रसारमाध्यमांनी शरद पवार यांनाच थेट विचारले असता, पार्थ पवार हे असमंजस (इमॅच्यूअर) आहेत. पक्षामध्ये त्यांच्या विधानाला कवडीची किंमत नाही, असे विधान शरद पवार यांनी केले होते. पवार यांच्या विधानाचे मोठे पडसाद राजकीय वर्तुळात आणि प्रसारमाध्यमांमध्ये उमटले. हे पडसाद अद्यापही कायम आहेत. (हेही वाचा, Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास CBI करणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय)
सत्यमेव जयते!
— Parth Pawar (@parthajitpawar) August 19, 2020
दरम्यान, शरद पवार यांनी फटकारल्यानंतर उमटलेले पडसाद अद्यापही ताजे आहेत. तोवर पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा सूचक ट्विट केले आहे. अर्थात, पार्थ पवार यांनी केलेल्या ट्विटमध्ये 'सत्यमेव जयते' हे शब्द वगळता इतर कोणताही उल्लेख नाही. अगदी कोणताही हॅशटॅगही नाही. त्यामुळे पार्थ पवार यांनी थेट शब्दांमध्ये काहीच सांगितले नाही. परंतू, त्यांच्या विधानाचे विविध अर्थ काढले जात आहेत.