
भारत सरकारच्या (Government Of India) कायदेशीर मागणीनंतर ट्विटर इंडियाने (Twitter India) भारतामध्ये पाकिस्तान सरकारचं (Pakistan Government) ट्विटर अकाऊंट्स दिसू नयेत यासाठी ब्लॉक केलेली आहेत. या कारवाई मागील कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. “भारतातील एका कायदेशीर मागणीला प्रतिसाद म्हणून पाकिस्तान सरकारचं भारतातील ट्विटर खातं निलंबित करण्यात आलं आहे”, असा संदेश लिहण्यात आला आहे. भारतामध्ये @GovtofPakistan हे ट्वीटर अकाऊंट बंद केलं असलं तरीही अमेरिका सह अन्य देशांमध्ये ती सक्रिय ठेवण्यात आली आहेत.
मागील 6 महिन्यांतील ही दुसरी वेळ आहे. 2022 च्या जुलै आणि ऑक्टोबरमध्ये याआधीच्या घटनांसह भारतात तिसऱ्यांदा खाते प्रतिबंधित केले गेले आहे. वैध कायदेशीर मागणी आणि विशेषत: न्यायालयीन आदेशाच्या स्वरूपात सादर केल्यावर Twitter ने त्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही कारवाई केली आहे. आता पाकिस्तान सरकारचे ट्विटर फीड सध्या भारतीय युजर्ससाठी उपलब्ध नसेल.

दरम्यान ट्वीटरच्या या कारवाई वर भारत किंवा पाकिस्तान कडूनही कोणतीही तातडीची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मागील ऑगस्टमध्ये, भारताने आठ YouTube-आधारित न्यूज चॅनेल बंद केली होती ज्यात पाकिस्तानमधील एक, तसेच बनावट, भारतविरोधी कॉन्टेट असलेली ऑनलाइन प्रसारित करणारे Facebook खातेही ब्लॉक केले होते.