
जम्मू काश्मीरमधील (Jammu and Kashmir) प्रसिद्ध पर्यटन स्थळ पहलगाममध्ये (Pahalgam) मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले. या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी बहुतेक पर्यटक आहेत, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. मृतांमध्ये दोन परदेशी आणि दोन स्थानिक नागरिकांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतर खोऱ्यातील हा सर्वात घातक दहशतवादी हल्ला आहे. स्थानिक प्रशासनाने श्रीनगरमध्ये आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे आणि लोकांना मदत करण्यासाठी फोन नंबर देखील जारी केले आहेत. या हल्ल्यामुळे केवळ भारतातच नाही तर जागतिक स्तरावरही चिंता निर्माण झाली आहे. हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा सौदी अरेबिया दौरा अर्धवट थांबवला आणि बुधवारी सकाळी दिल्लीत पोहोचले. पंतप्रधान लवकरच कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) च्या बैठकीला उपस्थित राहतील.
मंगळवारी दोन दिवसांच्या जेद्दाह दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान मोदी यांनी काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी क्राउन प्रिन्ससोबतची त्यांची नियोजित बैठक सुमारे दोन तासांसाठी पुढे ढकलली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर चर्चा केली. मोहम्मद बिन सलमान यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. या दरम्यान, दोन्ही देशांच्या नेत्यांनी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप कौन्सिलचे सह-अध्यक्षपद भूषवले. भारत आणि सौदी अरेबियामधील मैत्री आणखी मजबूत करण्याचा यामागील उद्देश आहे.
पंतप्रधान त्यानंतर लगेच भारताकडे रवाना होण्यासाठी निघाले. दिल्लीत पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्याबाबत विमानतळावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांच्याशी बैठक घेतली आणि हल्ल्याची, जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीची माहिती घेतली. आज पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ची बैठक होणार आहे. हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा श्रीनगरला पोहोचले आहेत. मंगळवारी रात्रीच त्यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली.
हा हल्ला पहलगामपासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसारनच्या निसर्गरम्य मैदानात दुपारी घडला, जिथे पर्यटक ट्रेकिंग आणि विश्रांतीसाठी येतात. अज्ञात बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला, ज्यामुळे 26 जणांचा मृत्यू झाला आणि 20 हून अधिक जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन परदेशी आणि दोन स्थानिक नागरिकांचा समावेश आहे, तर जखमींमध्ये 12 पर्यटकांचा समावेश आहे, ज्यांना पहलगाम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. हा हल्ला लश्कर-ए-तैयबा (LeT) ची छद्म संघटना द रेसिस्टेंस फ्रंट (TRF) ने केल्याचा दावा केला आहे. गुप्तचर यंत्रणांना संशय आहे की, लश्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख सैफुल्लाह कसूरी याने या हल्ल्याची योजना आखली. (हेही वाचा: Terrorist Attack in Pahalgam: हल्लेखोरांनी पीएम मोदींची निंदा केली, वडिलांना इस्लामिक श्लोक म्हणायला लावले; पुण्याच्या जखमी संतोष जगदाळे यांंची लेक आसावरी जगदाळे ने सांगितला थरारक प्रसंग)
राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) एक पथक श्रीनगरला पोहोचले असून, हल्ल्याची सखोल चौकशी सुरू आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने श्रीनगरला भेट दिली आणि मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. शाह यांनी हल्लेखोरांवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आणि सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले. जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे, विशेषतः पर्यटन स्थळे, धार्मिक स्थाने, आणि वाहतूक केंद्रांवर अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. या हल्ल्याबाबत जगभरात प्रतिक्रिया उमटत असून, अमेरिका, रशिया, नेपाळ, श्रीलंका, इटली, न्यूझीलंड, युके, यूएई यांसारख्या देशांनी हल्ल्याचा निषेध केला आणि पीडित कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या.