Pahalgam Terror Attack | (Photo Credit- X)

जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममधील एका रिसॉर्टवर मंगळवारी दहशतवाद्यांनी गोळीबार (Pahalgam Terror Attack 2025) केला. या घटनेत किमान 12 पर्यटक जखमी झाले आहेत. बैसारन मीडोज परिसरात ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. सीआरपीएफ (CRPF) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार सुमारे 3 ते 5 मिनिटे चालला आणि त्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरून पसार झाले. सध्या भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त शोधमोहीम सुरू केली आहे. राज्य आणि केंद्र सरकारने या घटनेची तातडीने नोंद घेतली असून, आवश्यक कारवाई सुरु केली आहे.

जखमी पर्यटक उपचारासाठी रुग्णालयात, मदतकार्य सुरू

जम्मू कश्मीर राज्यातील दहशतवादी हल्ल्यात एक पर्यटक गंभीर जखमी झाला असून त्याला अनंतनाग जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनास्थळी तात्काळ रेस्क्यू टीम आणि वैद्यकीय पथके दाखल झाली आहेत. जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (हेही वाचा, Jammu Kashmir Terrorist Attack: जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला; अमित शाह दौऱ्यावर असतानाच घडली घटना)

लष्कराची विक्टर फोर्स, विशेष बल, JKP ची विशेष कार्यबल (SoG) आणि CRPF 116 बटालियन यांनी संयुक्त ऑपरेशन सुरू केले आहे. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की ही घटना पहलगाम–डोडा मार्गावर घडलेली नाही.

महिला पर्यटकाचा गंभीर आरोप: 'धर्म विचारून मग गोळी झाडली'

हल्ल्यातून बचावलेली एक महिला पर्यटक म्हणाली की, दहशतवाद्यांनी आधी तिचं नाव आणि धर्म विचारला, त्यानंतर गोळी झाडली.

'त्यांनी आधी माझे नाव विचारले, मग धर्म, आणि नंतर मला गोळी मारली,' असे तिने अश्रूपूर्ण नयनांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. माझ्या पतीच्या डोक्यात गोळी लागली आहे, आणखी सातजण जखमी आहेत, असे सांगताना तिने जखमींना रुग्णालयात हलवण्यासाठी मदतीची विनंती केली.

सुरक्षा यंत्रणा सतर्क

जखमींची प्राथमिक यादी (अधिकृत तपासणी प्रलंबित):

  • Vino Bhat – गुजरात
  • Manik Patil
  • Rino Pandey
  • S. Balachandru – महाराष्ट्र
  • Dr. Parmeshwar
  • Abhijavan Rao – कर्नाटका
  • Santru – तामिळनाडू
  • Sahshi Kumari – ओडिशा

(टीप: ही यादी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तावर आधारीत आहे. अधिकृत स्रोतांद्वारे पुष्टीकरणाच्या अधीन आहे.)

राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याकडून हल्ल्याचा निषेध

जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले की, या भ्याड हल्ल्याचे नियोजन करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही. मी DGP व इतर सुरक्षा अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. लष्कर व पोलिस घटनास्थळी पोहोचले असून शोधमोहीम सुरू केली आहे.