Amit Shah | X @ANI

Cross-Border Terrorism: पहलगाम दहशतवादी हल्ला (Pahalgam Terror Attack) प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) राजीनामा देणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या दहशतवादी हल्ल्यावरुन शिवसेना खासदार, शिवसेना (यूबीटी) (Shiv Sena UBT) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. केंद्रातील सरकार पोकळ आहे. देशावर इतका मोठा आघात झाला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) अभिनेत्यांना भेटण्यात मग्न आहेत. या हल्ल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारुन केंद्रीय गृहमंत्र्यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, असेही राऊत म्हणाले. या वेळी त्यांनी मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला होता, याचीही आठवण करुन दिली. ते प्रसारमाध्यमांशी शुक्रवारी (2 मे) बोलत होते.

'सर्वांना समान न्याय लावा'

संजय राऊत यांनी म्हटले आहे की, मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. तेव्हा तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर आणि राज्यातील गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील यांचा राजीनामा घेण्यात आला होता. शिवाय, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचाही राजीनामा घेतला गेला होता. तोच न्याय केंद्रीय गृहमंत्र्यांना का लागू केला जाऊ नये? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. शिवाय, गृहमंत्र्यांनीही आपली नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. (हेही वाचा, Pahalgam Terror Attack: भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना दिलासा; देश सोडण्याची अंतिम मुदत पुढील आदेशापर्यंत वाढवली)

शरद पवार यांच्याबद्दल नाराजी

दरम्यान, काही लोक आता म्हणून लागले आहेत की, पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणात अमित शाह यांचा राजीनामा नको. पण मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्यावेळी शरद पवार यांनीच तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा राजीनामा घेतला होता आणि त्या वेळी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय गृहमंत्र्यांचाही राजीनामा झाला होता, हे या लोकांनी विसरु नये, अशा शब्दात संजय राऊत यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. शाह यांचा राजीनामा नको अशी भूमिका शरद पवार यांनी व्यक्त केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले होते. त्यावर राऊत बोलत होते.  (Pahalgam Terror Attack: भारताने पाकिस्तानचे पाणी केले बंद; Indus Waters Treaty स्थगित झाल्यानंतर सियालकोटजवळ चिनाब नदीचा प्रवाह झाला कमी, पहा उपग्रह प्रतिमा)

'देशाचे पोकळ नेतृत्व'; मोदींवर टीका

राऊत यांनी माध्यमांशी बोलताना, पंतप्रधानांच्या प्राधान्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि सरकारच्या 'पोकळ नेतृत्व' बद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, 'देशभर तीव्र संताप आहे आणि पंतप्रधान कोणत्याही प्रकारची चिंता न करता बॉलीवूड सेलिब्रिटींसोबत तासनतास घालवताना दिसतात. देशभरात मुक्तपणे फिरण्याच्या त्यांच्या क्षमतेचे श्रेय आपल्या सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्याला द्यायला हवे.'

राऊत यांनी जोर देऊन सांगितले की, संकटाच्या काळात विरोधी पक्ष देशाला पाठिंबा देत राहील परंतु गेल्या दशकात सत्ताधारी सरकारने केलेल्या चुकांकडे दुर्लक्ष करणार नाही. 'आवश्यकतेनुसार आम्ही सरकारला पाठिंबा देऊ, परंतु गेल्या दहा वर्षांत त्यांनी केलेल्या गंभीर चुका आणि चुका आम्ही माफ करणार नाही,' असे ते पुढे म्हणाले.