UBT Shivsena on Mahendra Thorve : विधानसभेच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. आधी शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यामध्ये बदलापूर येथे प्रसिद्ध आदर्श शाळेत लहान मुलींवर अत्याचाराची घटना घडली. हे प्रकरण शांत होत नाही. तोच आता शिंदे यांचे आमदार महेंद्र थोरवे(Mahendra Thorve) यांच्या सुरक्षा रक्षकाने एका कार चालकाला रॉडने मारहाण केल्याचा व्हिडीओ ठाकरे गटाकडून सोशल मिडीयावर शेअर करण्यात आला (Mahendra Thorve Bodyguard betten Car Driver)आहे. महाराष्ट्रात गुंडाराज म्हणत ठाकरे गटाकडून तो व्हिडीओ एक्सवर पोस्ट करण्यात आला आहे.
त्यामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुंडागिरीचे गंभीर आरोप होत आहेत. आमदार महेंद्र थोरवे यांच्या बॉडीगार्डने मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. भर रस्त्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. त्यावर विरोधकांनी प्रतिक्रीया व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनीही मारहाणीच्या या व्हिडीओवरून शिंदे गटावर ताशेरे ओढले आहेत. सत्तेची माज आणि माज आहे. त्याशिवाय कोण असं करत नाही. पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला आहे, असं ते म्हणाले.
ठाकरे गटाचा आरोप
नेरळमधील हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे. "मिंधे राजवट फक्त गुंडांसाठीच!", असा आशय लिहित ठाकरे गटाने सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. एका कारमध्ये एक व्यक्ती बसलाय. त्याच्यासोबत बाचाबाची झाल्यानंतर ही मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे. हातात दंडुका घेऊन त्या व्यक्तीला मारहाण केली जात आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ठाकरे गटाकडून उपस्थित केला जातोय. शिवा असं महेंद्र थोरवेंच्या बॉडीगार्डचं नाव आहे, त्याच्याकडून ही मारहाण केली जात असल्याचे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले आहे.
मिंधे राजवट फक्त गुंडांसाठीच!
महाराष्ट्रात गुंडाराज! मिंधेंच्या आमदाराच्या, महेंद्र थोरवे ह्यांच्या 'शिवा' नावाच्या बॉडीगार्डने नेरळ येथे भर दिवसा, भर रस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली. त्या व्यक्तीची बायका मुलं रडत होती, पण कोणी मदतीला यायची हिम्मत केली नाही...
कायद्याच्या चिंधड्या, लोकांचे हाल!
ही फक्त… pic.twitter.com/n0QX7Pp92x
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) September 11, 2024
दरम्यान, आमदार महेंद्र थोरवेंनी मारहाणीचे आरोप फेटाळले आहेत. 'मारहाण करणारा व्यक्ती माझा बॉडीगार्ड नाही. कार्यकर्त्यांमध्ये आपसात मतभेद आहेत. ज्याला मारहाण झाली आणि ज्याने मारहाण केली ते दोघेही आमच्याच पक्षाचे आहेत. नेमकं काय झालंय याबाबत मला कल्पना नाही. मी दर्शन घेण्यासाठी आलो होतो, आता गेल्यानंतर त्याबाबतची माहिती घेईल. या घटनेशी माझा संबंध नाही. आम्हाला सत्तेची मस्ती वगैरे नाही. आम्ही आमचं काम करत आहोत. ठाकरे गट त्याच भांडवल करत आहात', असे महेंद्र थोरवे यांनी म्हटले आहे.