Oxygen Shortage: ऑक्सिजनच्या मुद्द्यावरून दिल्ली उच्च न्यायालयाने फटकारले; 'ही दुसरी 'लाट' नाही तर ही 'Tsunami' आहे, आम्ही काय तयारी केली आहे?
Delhi High Court | (Photo Credits: PTI)

सध्या देशात वाढत असलेल्या कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गामुळे आरोग्य सेवा, औषधे, बेड्स, ऑक्सिजन (Oxygen) यांची कमतरता भासत आहे. देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. राजधानी दिल्लीची (Delhi) परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत आहे. ऑक्सिजनच्या अभावामुळे दिल्लीतील रुग्णालयांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेक रुग्णालये ऑक्सिजन कमतरतेची तक्रार करीत आहेत. आता ऑक्सिजनच्या कमतरतेबाबत महाराजा अग्रसेन रुग्णालयाने कोर्टात याचिका दाखल केली आहे. याबाबत शनिवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) कठोर टिप्पणी केली. तसेच ही कोरोनाची लाट नसून ही सुनामी (Tsunami) असल्याचे भाष्य केले.

दिल्लीतील महाराजा अग्रसेन रुग्णालय हे कोरेना रूग्णांसाठी ऑक्सिजनची प्रचंड कमतरता असलेल्या रुग्णालयांपैकी एक आहे. ऑक्सिजनची कमतरता दूर व्हावी व तातडीने त्याचा पुरवठा करण्यात यावा यासाठी महाराजा अग्रसेन रुग्णालयाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महाराजा अग्रसेन व्यतिरिक्त आणखी 3 रुग्णालयांनी याचिका दाखल केल्या आहेत. महाराजा अग्रसेन हॉस्पिटल व्यतिरिक्त जयपूर गोल्डन, सरोज हॉस्पिटल आणि बत्रा हॉस्पिटल यांनीही हायकोर्टात याचिका दाखल केली आहेत.

उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, दिल्ली सरकारने ऑक्सिजन टँकर खरेदी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे. आम्ही दोन्ही सरकारच्या अधिकाऱ्यांशी संवाद आणि समन्वय साधण्याची अपेक्षा करतो. कोर्टाने पुढे म्हटले आहे की, आम्ही ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्यांना दिल्लीच्या रुग्णालयात देण्यात येणाऱ्या ऑक्सिजनची संपूर्ण माहिती देण्याचे निर्देश देतो. कोर्टाने दिल्ली सरकारचे असे निवेदनही नोंदवले ज्यामध्ये म्हटले आहे की, दिल्लीत ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर नजर ठेवणारे त्यांच्याकडे 10 आयएएस अधिकारी आणि 14 DANICS अधिकारी आहेत. (हेही वाचा: दिल्लीतील जयपूर गोल्डन रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 20 रुग्णांचा मृत्यू)

सुनावणीदरम्यान हायकोर्टाने प्रश्न उपस्थित केला की, ही कोरोनाची दुसरी लाट नाही, तर ही त्सुनामी आहे. सध्या नवीन संसर्गांची प्रकरणे वाढत आहे व मे महिन्यामध्ये ही प्रकरणे पीकवर पोहोचतील. तेव्हा त्यावेळी या विषाणूशी लढण्यासाठी आम्ही कोणत्याप्रकारे तयारी केली आहे?