Manipur Violence (Image Credit - Twitter)

सध्या मणिपूर हिंसाचार (Manipur Violence) आणि तिथे महिलांवर झालेल्या अमानुष अत्याचारामुळे देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन मणिपूरच्या मुद्द्यावरून ठप्प राहिले आहे. अशात विरोधी आघाडी 'इंडिया'ची (INDIA) एक टीम शनिवारी सकाळी मणिपूरला जाणार आहे. त्यात 16 पक्षांच्या 20 खासदारांचा समावेश असेल. मणिपूरमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून दोन समुदायांमध्ये सुरू असलेल्या जातीय हिंसाचारावर संसदेत सतत चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्ष करत आहेत. आता या खासदारांच्या भेटीचा उद्देश राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्याचा आहे. यापूर्वी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी मणिपूरमधील बाधित भाग आणि मदत शिबिरांना भेट दिली होती.

मणिपूरला जाणाऱ्या विरोधकांच्या शिष्टमंडळात विविध पक्षांच्या खासदारांचा समावेश आहे. या शिष्टमंडळात जे 20 खासदार असणार आहेत, त्यामध्ये- ​​अधीर रंजन चौधरी, गौरव गोगोई, राजीव रंजन, सुष्मिता देव, कनिमोळी, संतोष कुमार, ए.ए. रहीम, मनोज झा, जावेद अली खान, महुआ माजी, मोहम्मद फैजल, अनिल हेगडे, मोहम्मद बशीर, एनके प्रेमचंद्रन, सुशील गुप्ता, अरविंद सावंत, रवी कुमार, थिरुमावलावन, जयंत सिंग आणि फुलो देवी नेताम यांचा समावेश आहे.

काही काळापासून विरोधी पक्षांचे नेते मणिपूरला भेट देण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तेथील अस्थिर परिस्थितीमुळे त्यांच्या विनंतीला परवानगी नाकारण्यात आली. मणिपूरमधील परिस्थितीवर संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा व्हावी आणि हिंसाचाराबाबत पंतप्रधानांच्या वक्तव्याची मागणी विरोधी पक्ष करत आहेत. सरकारने संसदेत चर्चा करण्याचे मान्य केले आहे. खासदारांचे शिष्टमंडळ शनिवारी सकाळी 8.55 च्या विमानाने मणिपूरला रवाना होईल. मणिपूरमधील हिंसाचारग्रस्त भागांचा हा दोन दिवसांचा दौरा आहे.

काँग्रेसचे खासदार सय्यद नसीर हुसेन यांनी सांगितले की, शनिवारी इंडिया आघाडीचे एक शिष्टमंडळ डोंगराळ प्रदेश आणि खोऱ्यातील (मणिपूरमधील) हिंसाचारग्रस्त मदत शिबिरांना भेट देईल. आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत हा संदेश घेऊन जात आहोत. प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही आमच्या क्षमतेनुसार सर्वकाही करू. यासह राज्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी हे शिष्टमंडळ 30 जुलै रोजी सकाळी 10 वाजता राज्यपाल अनुसुया उईके यांची भेट घेणार आहे. (हेही वाचा: Manipur Viral Video Case: गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय! मणिपूरच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणाची CBI करणार चौकशी)

साधारण 3 मे पासून राज्यात मैतेई आणि कुकी या दोन समुदायांमधील जातीय हिंसाचारात सुमारे 150 लोकांचा मृत्यू झाला आहे. भीतीपोटी राज्यातील अनेकांनी जवळच्या राज्यात स्थलांतर केले आहे.