Ola Electric To Fire 500 Employees: इलेक्ट्रिक वाहन (EV) कंपनी ओलामध्ये (Ola) नोकर कपात होणार आहे. भाविश अग्रवाल यांची ईव्ही कंपनी आपल्या व्यवसायाच्या संरचनेत बदल करत आहे, म्हणजेच पुन्हा एकदा पुनर्रचना केली जाणार आहे. यामुळे कंपनीतील विविध विभागातील सुमारे 500 कर्मचाऱ्यांना झटका बसू शकतो. मनीकंट्रोलला सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. सूत्रांच्या मते, कंपनी केवळ नफा मिळविण्याच्या प्रयत्नात आपले मार्जिन सुधारण्यासाठी टाळेबंदीचा मार्ग अवलंबत आहे.
याआधी सुमारे सात महिन्यांपूर्वी, ओला इलेक्ट्रिकची कंपनी ओला कंझ्युमरने एक पुनर्रचना योजना तयार केली, ज्या अंतर्गत किमान 10 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. त्याचवेळी ओला कॅबचे सीईओ हेमंत बक्षी यांनीही कंपनी सोडली होती.
ओला इलेक्ट्रिक पहिल्यांदाच आपल्या व्यवसायाची रचना बदलत आहे असे नाही. यापूर्वी, आयपीओ लाँच करण्यापूर्वी, कंपनीने दोन पुनर्रचना केल्या होत्या. जुलै 2022 मध्ये मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना योजना जाहीर करण्यात आली. या अंतर्गत कंपनीचे तीन व्यवसाय- वापरलेल्या कार, क्लाउड किचन आणि किराणा डिलिव्हरी बंद करण्यात आले आणि सुमारे 1 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. व्यवसायाचे केंद्रीकरण करण्यासाठी सप्टेंबर 2022 मध्ये नवीन कर्मचाऱ्यांची टीम जाहीर करण्यात आली. (हेही वाचा: Bosch Layoffs: बॉश 7 हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट, कंपनीमध्ये होणार नोकर कपात)
ईव्ही व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यासाठी कंपनीने हे केले होते. या छाटणीनंतर, सुमारे 1 हजार कर्मचाऱ्यांना ईव्ही व्यवसायामधून काढून टाकले. महत्वाचे म्हणजे, या टाळेबंदीनंतर, कंपनीने इव्ही व्यवसायासाठी सुमारे 800 कर्मचारी नियुक्त करण्याची योजना देखील आखली. दरम्यान, ओला इलेक्ट्रिकच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास, सप्टेंबर 2024 तिमाहीत कंपनीची कमाई वार्षिक आधारावर 896 कोटी रुपयांवरून 1,246 कोटी रुपयांवर गेली आहे. डिलिव्हरीमध्ये 73.6 टक्क्यांनी वाढ झाली, जी या कालावधीत 56,813 युनिट्सवरून 98,619 युनिट्सपर्यंत वाढली. या काळात कंपनीचा तोटा 524 रुपयांवरून 495 रुपयांवर घसरला.