भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J. P. Nadda) यांनी केलेल्या विधानाचे पडसाद देशभर उमटू लागले आहेत. त्याची सुरुवात बिहारमधून झाल्याचे पाहायला मिळत आहे. बिहारमध्ये भाजपची (BJP) साथ सोडत नीतीश कुमार (Nitish Kumar) यांचा जेडीयु लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या राजद (RJD) सोबत सत्ता स्थापन करतो आहे. या सरकारमध्ये नीतीश कुमार मुख्यमंत्री तर तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) हे उपमुख्यमंत्री असतील. या नव्या सरकारचा शपथविधी आज (बुधवार, 10 ऑगस्ट) दुपारी 2 वाजता पार पडतो आहे. या शपथविधीनुसार नीतीश कुमार हे आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. बिहारच्या मुख्यमंत्री पदावर प्रदीर्घ काळ राहिलेला चेहरा म्हणून नीतीश कुमार यांना ओळखले जात आहे. भाजपची साथ सोडत नीतीश कुमार यांनी आरजेडीसह 7 पक्षांच्या महागठबंधनसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बिहारमधील राजभवन येथे दुपारी दोन वाजता हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यात नीतीश कुमार आणि तेजस्वी यादव हे अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. त्यानंतर हळूहळू मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. नीतीश कुमार (Nitish Kumar) यांनी कार राज्यपाल फागू चौहान यांच्याशी चर्चा करुन आठव्यांदा राज्यामध्ये सरकार बनविण्याचा दावा केला होता. नीतीश कुमार यांनी राज्यपालांसोबत मंगळवारी दोन वेळा चर्चा केली. (हेही वाचा, Nitish Kumar Resigns: नीतीश कुमार यांचा बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा; भाजपला धक्का देत RJD, काँग्रेस डाव्यांसोबत स्थापन करणार नवे सरकार)
बिहार विधानसभा पक्षीय बलाबल
एकूण सदस्य संख्या-243
राष्ट्रीय जनता दल-79
भाजप-77
जनता दल युनायटेड-45
काँग्रेस- 19
कम्यूनिस्ट पार्टी फ इंडिया (एमएल)- 12
हिंदुस्तानी अवाम मोर्चा (हम)- 4
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट)- 2
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया- 2
अपक्ष-1
रिक्त जागा- 1
नीतीश कुमार यांनी पहिल्यांदा भाजप आणि राजग यांच्या नेतृत्वातील गठबंधनच्या नेतृत्वातील सरकारमधील मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राजदसह 7 पक्षांच्या महागठबंधनसोबत सरकार स्थापन करण्यासाठी पावले टाकली. नीतीश कुमार हे राजदसोबत दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करत आहेत. नीतीश कुमार यांना गठबंधनच्या रुपात आता 164 आमदारांचा पाठींबा आहे. नीतीश यांनी तसे पत्रही राज्यापालांना दिले आहे. बिहार विधानसभेच्या सदस्यांची संख्या 242 इतकी आहे. तर बहुमताचा आकडा 122 इतका आहे. आता नीतीश यांच्या पाठीशी 164 आमदार आहेत. त्यामुळे सहाजिकच बहुमताचा आकडा पूर्ण झाला आहे.