Nirbhaya Gang Rape: दिल्ली निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय ठाकूरची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळली
Nirbhaya case convict Akshay Singh | (Photo Credits: Twitter)

आज, बुधवार 5 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपतींनी निर्भया प्रकरणातील (Nirbhaya Gang Rape) दोषी, अक्षय ठाकूर (Akshay Thakur) याची दया याचिका फेटाळली आहे. यापूर्वी मुकेश आणि विनय यांची दया याचिका राष्ट्रपतींकडून फेटाळण्यात आली होती, तर पवन याने अद्याप दया याचिका दाखल केलेली नाही. अक्षयची दया याचिका 1 फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आली होती, जी आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांनी फेटाळून लावली आहे.

दुसरीकडे, दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले आहे की, निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील सर्व दोषींना स्वतंत्रपणे नव्हे तर एकत्र फाशी देण्यात यावी. केंद्र सरकारने या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती की, चारही दोषी न्यायालयीन प्रक्रियेचा गैरफायदा घेत आहेत. म्हणून, ज्या दोषींची दया याचिका नाकारली गेली आहे किंवा त्यांची याचिका प्रलंबित नाही, त्यांना फाशी देण्यात यावी.

त्याचबरोबर कोर्टाने फाशीची शिक्षा थांबविण्याच्या निम्न न्यायालयाच्या निर्णयाविरूद्ध केंद्राची याचिका फेटाळली. निकालाचा महत्त्वपूर्ण भाग वाचून न्यायमूर्ती सुरेशकुमार कैत यांनी दोषींना असे निर्देश दिले की, ते आता उपलब्ध असलेल्या कायदेशीर उपाययोजनांतर्गत सात दिवसांच्या आत अर्ज करू शकतात, त्यानंतर अधिकाऱ्यांनी कायद्यानुसार कारवाई करावी. 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आरोपीचे अपील फेटाळून लावल्यानंतर, डेथ वॉरंट जारी करण्यासाठी पावले न उचलल्याबद्दल न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना आज फैल्लावर घेतले. (हेही वाचा: Nirbhaya Rape Case दोषींच्या फाशीवरील स्थगितीला तिहार जेल कडून दिल्ली हायकोर्टात आव्हान)

पीडितेच्या पालकांनी आणि दिल्ली सरकारने या प्रकरणाबाबत चार दोषींना फेब्रुवारी 2019 आणि 18 डिसेंबर 2019 रोजी फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली होती. केंद्र आणि दिल्ली सरकारने 31 जानेवारीच्या कोर्टाच्या आदेशाला आव्हान दिले होते, ज्याद्वारे या प्रकरणातील चार दोषींची फाशी 'पुढील आदेश' येईपर्यंत थांबविण्यात आली होती. हे चार दोषी - मुकेश कुमार सिंह, पवन गुप्ता, विनय कुमार शर्मा आणि अक्षय कुमार सध्या तिहार तुरुंगात कैद आहेत.