Mallikarjun Kharge (Photo Credit - PTI)

नवीन संसद भवनाच्या (New Parliament) 28 मे रोजी होणाऱ्या उद्घाटनापूर्वी काँग्रेस केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहे. नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांच्या हस्ते व्हावे यासाठी काँग्रेस आग्रही आहे. मात्र या आठवड्यात संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित करण्यात आले नसल्याचा दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. सोमवारी खरगे यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना न बोलावल्याने केंद्र सरकारवर निशाणा साधला.

लोकसभा सचिवालयानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 28 मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. त्याआधी भाजप सरकार घटनात्मक शिष्टाचाराचा वारंवार अवमान करत असल्याचा आरोप खरगे यांनी केला आणि म्हणाले की, राष्ट्रपतींचे कार्यालय प्रतीकात्मकतेत कमी झाले आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, ‘असे दिसते की मोदी सरकारने केवळ निवडणुकीच्या कारणास्तव दलित आणि आदिवासी समुदायातून राष्ट्रपती निवडले आहेत. भारताच्या राष्ट्रपती श्रीमती. द्रौपदी मुर्मू यांना नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आलेले नाही. भारताची संसद ही भारतीय प्रजासत्ताकची सर्वोच्च कायदेमंडळ संस्था आहे आणि भारताचे राष्ट्रपती हा तिचा सर्वोच्च घटनात्मक अधिकार आहे. राष्ट्रपती हे भारताचे पहिले नाघारिक असतात. त्यांच्या हस्ते संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन हे लोकशाही मूल्ये आणि घटनात्मक औचित्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतीक असेल. भाजप-आरएसएस सरकारच्या अंतर्गत भारताच्या राष्ट्रपतींच्या कार्यालयाचे म्हतव कमी झाले आहे.’

खरगे यांनी सांगितले की, नव्या संसदेची पायाभरणी करताना तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही निमंत्रित करण्यात आले नव्हते. आम आदमी पक्षानेही पंतप्रधानांच्या हस्ते संसद भवनाच्या उद्घाटनावर आक्षेप घेतला. संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलावणे हा देशातील आदिवासी आणि मागासलेल्या समुदायांचा अपमान असल्याचे आपने सोमवारी म्हटले आहे. (हेही वाचा: कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून Bengaluru मध्ये विधानसभा परिसरात 'गोमुत्र' शिंपडून शुद्धीकरण)

दरम्यान, 18 मे रोजी लोकसभा सचिवालयाने घोषणा केली की स्पीकर ओम बिर्ला यांनी पीएम मोदींची भेट घेतली आणि त्यांना नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले. तेव्हापासून अनेक विरोधी नेत्यांनी प्रश्न केला आहे की पंतप्रधान मोदी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन कसे काय करू शकतात? रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पंतप्रधानांनी नव्हे तर राष्ट्रपतींनी केले पाहिजे.