New Lok Sabha: नुकतेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा जनादेश जाहीर झाला आहे. यंदाच्या 18व्या लोकसभेच्या निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी भाजपला 240 जागा मिळाल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस आहे ज्यांचे 99 खासदार लोकसभेत पोहोचतील. आता 293 जागांसह एनडीए सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. नवीन लोकसभेच्या स्थापनेच्या तयारीच्या दरम्यान, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने 2024 मध्ये निवडणूक जिंकणाऱ्या सर्व 543 विजयी उमेदवारांच्या शपथपत्रांचे विश्लेषण केले आहे.
विश्लेषणात असे म्हटले आहे की, 543 विजयी उमेदवारांपैकी 251 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. आणि 504 विजयी उमेदवार करोडपती आहेत. लोकसभा निवडणूक 2024 मधील प्रत्येक विजयी उमेदवाराकडे सरासरी 46.34 कोटी रुपयांची संपत्ती आहे. पुष्पेंद्र सरोज आणि प्रिया सरोज हे सर्वात तरुण विजयी उमेदवार आहेत. 25 वर्षांचे नवनिर्वाचित दोन्ही खासदार सपाच्या तिकिटावर विजयी झाले आहेत. सर्वात वयस्कर नवनिर्वाचित खासदार डीएमकेचे टीआर बाळू आहेत, जे 82 वर्षांचे आहेत.
एडीआरने शेअर केलेल्या डेटाच्या विश्लेषणानुसार, लोकसभा निवडणुकीत 543 विजयी उमेदवारांपैकी 251 जणांवर गुन्हे दाखल असून, त्यापैकी 170 जणांवर खून, खुनाचा प्रयत्न, महिलांविरोधातील गुन्हे आणि द्वेषयुक्त भाषण यासह गंभीर गुन्हे दाखल आहेत. 543 पैकी 251 (46%) विजयी उमेदवारांनी स्वत:वर फौजदारी खटले घोषित केले आहेत. 170 (14%) विजयी उमेदवारांनी स्वतःविरुद्ध गंभीर गुन्हे घोषित केले आहेत. 27 विजयी उमेदवारांनी त्यांच्याविरुद्ध दोषी ठरलेले खटले घोषित केले आहेत. (हेही वाचा: Biggest Stock Market Scam: 'शेअर मार्केटमधील सर्वात मोठा घोटाळा'; Rahul Gandhi यांचे PM Narendra Modi, Amit Shah यांच्यावर गंभीर आरोप, JPC चौकशीची मागणी)
यासह चार विजयी उमेदवारांनी स्वतःविरुद्ध खुनाचे गुन्हे (IPC-302) घोषित केले आहेत, तर 27 विजयी उमेदवारांनी खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे (IPC-307) घोषित केले आहेत. ज्या विजयी उमेदवारांनी महिलांवरील अत्याचाराशी संबंधित प्रकरणे जाहीर केली आहेत, त्यांची संख्या 15 आहे. यापैकी दोन विजयी उमेदवारांविरुद्ध बलात्काराशी संबंधित (IPC-376) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकडेवारीनुसार, 543 विजयी उमेदवारांपैकी फक्त 74 (14%) महिला आहेत. यापूर्वी 2019 मध्ये 77 विजयी उमेदवार महिला होत्या. जर आपण विजयी उमेदवारांच्या वयाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, 58 विजयी उमेदवार हे 25 ते 40 वर्षे वयोगटातील आहेत. 280 उमेदवार 41 ते 60 वर्षे वयोगटातील आहेत. 204 विजयी उमेदवार 61 ते 80 वर्षे वयोगटातील आहेत.