31 ऑक्टोबर रोजी होणार नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी? जाणून घ्या का बोलावली उद्धव ठाकरे यांनी तातडीने बैठक
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना (Archived, edited, images)

महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षात सरकार कोणाचं यावर चर्चा रंगात आहेत. शिवसेना पक्ष या निर्णयात किंग मेकर ठरणार हे जरी खरं असलं तरी सरकार महायुतीचं असणार कि शिवसेना आघाडी सोबत हात मिळवणी करणार हे मात्र नक्की झालेलं नाही.

शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार की नाही यासाठी एक विशेष बैठक उद्या तातडीने पक्षाकडून घेण्यात येणार आहे. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीच आपलं सरकार पुन्हा बनवेल तर नव्या मुख्यमंत्र्यांची शपथविधी 31 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तसेच ही शपथ विधी मुंबईतील महालक्ष्मी रेस कोर्सवर होण्याची सध्या चर्चा सुरु आहे.

मुख्यमंत्री पदाबाबत उद्या मातोश्रीवर शिवसेनेची तातडीची बैठक

शिवसेनेची बैठक उद्या मातोश्रीवर दुपारी 12 वाजता होणार आहे. शिवसेनेचे नवनिर्वातीच आमदारांसह नेतेमंडळी या बैठकीला उपस्थित राहणार असून मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सर्व आमदरांचा कल जाणून घेणार आहेत व त्यानंतरच योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.

विधानसभेच्या निकालानुसार भारतीय जनता पक्षाने 105 जागी विजय मिळवला आहे तर शिवसेनेने 56 जागी बाजी मारली आहे.

दरम्यान, वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांचा विजय झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचे पोस्टर झळकवण्यात आले आहेत आणि या पोस्टरवर मा. भावी मुख्यमंत्री असे सुद्धा लिहिण्यात आले आहे.