'नथूराम गोडसे देशभक्त', भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांचे वादग्रस्त विधान
Pragya Singh Thakur | (Photo Credit: ANI)

भोपाळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Pragya Singh Thakur) यांनी नथूराम गोडसे (Nathuram Godse) याच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. नथूराम गोडसे हा देशभक्त (Deshbhakt) असल्याचे प्रज्ञा सिंह यांनी म्हटले आहे. अभिनेता कमल हासन यांनी नथूराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी असल्याचे म्हटले होते. कमल हासन यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नथूराम गोडसे देशभक्त होता. तो देशभक्त आहे आणि देशभक्तच राहिल नथूरामवर टीका करणाऱ्यांनी आगोदर स्वत:कडे पाहावे, असेही प्रज्ञा सिंह यांनी म्हबटले आहे.

नथूराम गोडसे याने महात्मा गांधी यांच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर गोडसे याच्यावर खटला भरण्यात येऊन त्याला फाशी देण्यात आले. महत्त्वाचे असे की, नथूराम गोडसे याला देशभक्त म्हणणाऱ्या प्रज्ञा सिंह यांच्यावरही मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप आहे. त्यांना भाजपने तिकीट देऊन भोपाळ येथून काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या विरोधात मैदानात उतरवले आहे.

वादग्रस्त विधान देण्याची प्रज्ञा सिंह यांची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही प्रज्ञा सिंह यांनी वादग्रस्त विधाने केली आहे. 26/11 ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले एटीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबाबत प्रज्ञा यांनी वादग्रस्त विधान केले होते. हेमंत करकरे यांनी मला चुकीच्या पद्धतीने या प्रकरणात अडकवले होते. त्या वेळी मी त्याला म्हटलं होतं की, तुझा संपूर्ण वंश बुडेल. त्यानंतर मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यात करकरे आपल्या कर्माने मारले गेले, असे प्रज्ञा सिंह यांनी म्हटले होते. (हेही वाचा: साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल)

एएनआय ट्विट

दरम्यान, प्रज्ञा सिंह यांच्या करकरे यांच्याबद्दलच्या विधानापासून भाजपने सावध पवित्रा घेत स्वत:ला दूर केले होते. करकरे यांच्याबाबत प्रज्ञा सिंह यांनी केलेले विधान हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे. पक्षाशी त्याचा कोणताही संबंध नसल्याचे भाजपने म्हटले होते.