उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील रायबरेली (Raebareli) येथून एक धक्कादायक वृत्त पुढे आले आहे. येथील स्थानिक पोलिसांनी नसीराबाद (Nasirabad) येथील एका गावप्रमुखासोबत (Village Head Representative) कथीतरित्या गैरवर्तन केल्याचा दावा केला जात आहे. गावप्रमुख असलेल्या सुशील शर्मा यांनी म्हटले आहे की, आपण आयोजित केलेल्या 'नौटंकी' कार्यक्रमास (Nautanki Program) स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेतल्याचे सांगत पोलिसांनी आणास धक्काबुक्ती आणि शिवीगाळ केली. तसेच, त्यांनी आपणास थुंकी चाटण्यास भाग पाडले. दरम्यान, पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, चौकशी सुरु केली आहे. पोलिस अधीक्षक (एसपी) यशवीर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीची सखोल चौकशी करण्यासाठी अतिरिक्त पोलिस अधीक्षकांना नियुक्त करण्यात आले असून, तपास सुरु आहे.
'नौटंकी' कार्यक्रमाचे परवानगीशिवाय आयोजन
रायबरेली येथील कपूरपूर गावाच्या प्रमुखाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुशील शर्मा यांनी 30 ऑक्टोबर रोजी अधिकृत परवानगीशिवाय 'नौटंकी' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अधिकाऱ्यांचा आरोप आहे की, स्वत: शर्मा आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या इतरांनी अतिप्रमाणावर मद्यप्राशन केले. नंतर त्यांनी सामाजिक शांतता भंग होईल, असे असभ्य वर्तन केल. ज्यामुळे स्थानिकांकडून पोलिसांना तक्रारी प्राप्त झाल्या. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचे एक पथक आले तेव्हा त्यांना विरोधाला सामोरे जावे लागले, परिणामी शर्मा यांच्यासह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. (हेही वाचा, UP Shocker: गृहपाठ अपूर्ण राहिला म्हणून शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण; विद्यार्थ्याचा दात तुटला, बेशुद्ध झाला)
पोलिसांकडून मारहाण
सुशील शर्मा यांनी एका निवेदनात आरोप केला आहे की, पोलीस रात्री उशिरा कार्यक्रम थांबवण्यासाठी आले. त्यांनी आपण आणि इतर चार जणांना ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तेथे त्यांना पोलिसांकडून शारीरिक मारहाण झाली. निवेदनात पुढे सांगण्यात आले की, शर्मा यांना जमीनीवर थुंकून स्वत:चीच थुंकी चाटण्यास भाग पाडले गेले. या प्रकरणानंतर उत्तर प्रदेश राज्यातील काही भागात सामाजिक तणाव निर्माण झाला आहे.
दरम्यान, शर्मा यांनी नासिराबाद स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) शिवकांत पांडे यांच्यावर 2 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला, ज्यामुळे परिस्थिती चिघळली. या आरोपांच्या प्रत्युत्तरात, राष्ट्रीय पंचायती राज ग्राम प्रधान संघटनेने शनिवारी एसपी कार्यालयात औपचारिक तक्रार दाखल केली आणि अधिकाऱ्यांना या घटनेचा तपास करून योग्य ती कारवाई करण्याचे आवाहन केले. या प्रकरणाने ग्रामीण उत्तर प्रदेशातील पोलिसांच्या कथित गैरवर्तनाकडे लक्ष वेधले आहे, ज्यामुळे स्थानिक प्रतिनिधींच्या वागणुकीबद्दल चिंता निर्माण झाली आहे आणि विविध सामुदायिक संघटनांकडून न्यायाची मागणी केली जात आहे.