नरेंद्र मोदी हे माझे सुद्धा पंतप्रधान! दिल्ली विधानसभा निवडणुकीला टार्गेट करत भडकावू पाहणाऱ्या पाकिस्तानी मंत्र्याला केजरीवाल यांचे चोख उत्तर
अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली (Archived images)

देशात अंतर्गत कितीही वाद असला तरी दहशतवादाच्या सर्वात मोठ्या प्रायोजकांचा हस्तक्षेप आम्ही खपवून घेणार नाही अशा शब्दात आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद हुसेन (Fawad Hussain) यांना सुनावले आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे भारताचे पंतप्रधान आहेत आणि त्याच अर्थाने ते माझे सुद्धा पंतप्रधान आहेत, दिल्लीची विधानसभा निवडणूक (Delhi Assembly Elections) हा भारताचा अंतर्गत मुद्दा असला तरीही इतरांनी त्याची ढाल करून भारताच्या एकतेवर प्रहार करण्याचा प्रयत्न करू नये असे सांगताना पाकिस्तानने कितीही प्रयत्न केला तरी ते भारताची एकता तोडू शकणार नाहीत असा थेट इशारा सुद्धा केजरीवाल यांनी दिला आहे. पाकिस्तानला पराभवाची धूळ चारण्यासाठी 10 दिवसही लागणार नाहीत- पंतप्रधान नरेंद्र मोदी

काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला हरवण्यासाठी भारताच्या जवानांना केवळ 7 ते 10 दिवस पुरेसे आहेत असे विधान केले होते त्यावरून फवाद यांनी उत्तर देताना मोदींचे संतुलन दिल्ली निवडणुकांमुळे हलले आहे असे म्हणत एक ट्विट केले होते, आज केजरीवाल यांनी फवाद यांच्या ट्विटला खरमरीत शब्दात चोख उत्तर दिले आहे.

फवाद हुसेन यांनी ट्विट करताना भारताच्या लोकांनी मोदी मॅडनेस ला थांबवण्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे असा सल्ला दिला होता. दिल्ली विधानसभा निवडणुकांमुळे आणखीन एका राज्यातील सत्ता हातून जाण्याची शक्यता असताना तसेच काश्मीर, सीएए , आर्थिक विकासाचा उतरता दर यावर भारतात व भारताबाहेरील प्रतिक्रिया पाहून मोदींचे संतुलन बिघडले आहे, असेही फवाद यांनी म्हंटले होते. यावर अरविंद केजरीवाल यांनी तुम्ही आमच्या अंतर्गत मुद्द्यात हस्तक्षेप करू नका असा थेट इशारा दिला आहे.

अरविंद केजरीवाल ट्विट

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजधानी मध्ये प्रचाराचे वारे वेगाने वाहत आहेत. साहजिकच प्रचारात कधी भाजप कडून तर कधी आप कडून एकमेकांचा विरोध दर्शवणारी अनेक विधाने केली जात असतात, पण अशातही नरेंद्र मोदी यांचे समर्थन करून अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या या उत्तरावर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.