नंदुरबार जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली असून यामुळे तळोदा तालुक्यावर शोककळा पसरली आहे. या ठिकाणी आजोबांसोबत शेतात गेलेल्या दहा वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला करत ठार केल्याची घटना घडली आहे. तळोदा तालुक्यातील दलेलपुर या गावात ही घटना घडली असून या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणी वनविभागाकडून कोणतीही कारवाई केली न गेल्याने नाराजी देखील व्यक्त करण्यात आली आहे. (हेही वाचा - Viral Video: रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा संतापली, चप्पल काढण्यावरून खासदाराशी वाद)
या परिसरातील बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे अशी मागणी अनेक वेळा स्थानिक नागरिकांनी केली होती. वन विभागाने यापूर्वीच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न केले असते तर 10 वर्षाच्या बालकाला आपले प्राण गमवावे लागले नसते अशी प्रतिक्रीया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
या घटने बद्दल मिळालेल्या अधिक माहितीनूसार शेतमजूर खेत्या वसावे हे नातू गुरुदेव वसावे (वय १०) याला सोबत घेऊन शेतात जात असताना त्याठिकाणी दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. आजोबांनी काठीने बिबट्याला पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला होता. घटनेनंतर त्याला तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी मृत घोषीत करण्यात आले.
या घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात मागील काही घटनांवरून बिबट्यांची संख्या तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे दिसून येत आहे.