Mukesh Ambani (Photo Credits: IANS)

रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industries) शुक्रवारी (5 नोव्हेंबर) उशिरा एक निवेदन जारी केले, त्यात म्हटले आहे की, मुकेश अंबानी (Mukesh Ambani) व कुटुंब लंडनमध्ये (London) राहायला जाणार असल्याच्या बातम्या निराधार आहेत. नुकत्याच एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनंतर लोकांनी अंदाज लावला की, अंबानी कुटुंब लंडनच्या स्टोक पार्कमध्ये राहणार आहे. त्यानंतर अनेक माध्यमांनी अशा आशयाचे वृत्त दिले परंतु हे वृत्त पूर्णतः खोटे आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने असेही स्पष्ट केले की, अंबानी किंवा त्यांच्या कुटुंबाची लंडन किंवा जगातील इतर कोणत्याही शहरात स्थलांतरित होण्याची कोणतीही योजना नाही.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी लंडनच्या स्टोक पार्कमध्ये 592 कोटी रुपये खर्चून 300 एकर जमिनीवर पसरलेली एक हेरिटेट प्रॉपर्टी खरेदी केली आहे. या ठिकाणी 49 बेडरूमसह अनेक सुखसुविधा आहेत. मिड-डे या इंग्रजी वृत्तपत्रानुसार, मुकेश अंबानी यांनी बर्किंगहॅमशायरमधील स्टोक पार्कजवळ ही जमीन खरेदी केली आहे. त्यानंतर माध्यमांनी बातम्या दिल्या होत्या की, मुकेश अंबानी हे आपल्या कुटुंबासोबत भारत सोडून लंडनला शिफ्ट होत आहेत.

हे वृत्त समोर आल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने शुक्रवारी सायंकाळी उशिरा सांगितले की, माध्यमांनी निराधार वृत्त प्रसिद्ध केले आहे. या निवेदनामध्ये पुढे म्हटले आहे की, रिलायन्स ग्रुपची कंपनी RIIHL ने स्टोक पार्कमध्ये मालमत्ता खरेदी केली आहे. या हेरिटेज प्रॉपर्टीचा वापर प्रीमियर गोल्फिंग आणि स्पोर्टिंग रिसॉर्ट उभारण्यासाठी केला जाईल. त्यासाठी स्थानिक नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाईल. कंपनीचा वेगाने वाढणारा ग्राहक व्यवसाय पाहता ही मालमत्ता संपादित करण्यात आली आहे. याद्वारे आम्हाला भारताच्या आदरातिथ्य संस्कृतीला जागतिक दर्जाची ओळख द्यायची आहे.’ (हेही वाचा: भारत सोडून लंडनला शिफ्ट होणार मुकेश अंबानी व कुटुंब; 300 एकरमध्ये 49 हून अधिक खोल्यांचे अलिशान घर तयार- Reports)

दरम्यान, अंबानी यांनी खरेदी केलेल्या या जागेत स्विमिंग पूल, मिनी हॉस्पिटल, क्लब, ऑडिटोरियम, पार्क, ओपन एरिया आहे. घरासाठी वेगळा रस्ता तयार करण्यात आला आहे. हे आलिशान घर 300 एकरपेक्षा जास्त जागेत तयार करण्यात आले आहे. घरात विशेष मंदिराची स्थापना केली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअरच्या अहवालानुसार, मुकेश अंबानी सध्या जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींमध्ये 11 व्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 7 लाख कोटी रुपयांहून अधिक आहे.