मुकेश अंबानी यांची E-commerce क्षेत्रात उडी; Amazon आणि Flipkart ला टक्कर देण्यासाठी 1.6 लाख कोटी रुपयांच्या कंपनीची योजना
Mukesh Ambani (Photo Credit: File Photo)

लवकरच मुकेश अंबानी (Mukesh Ambani) ई-कॉमर्स (E-commerce) क्षेत्रात उडी घेत आहेत. अंबानी यांनी डिजिटल सर्व्हिस होल्डिंग कंपनी तयार करण्यासाठी 24 अब्ज डॉलर्स (1.6 लाख कोटी रुपये) ची योजना आखली आहे. या योजनेच्या मदतीने भारतात इंटरनेट शॉपिंगवर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार मुकेश अंबानी यांची संपत्ती जवळपास 56 बिलियन डॉलर (3.85 हजार कोटी रुपये) इतकी आहे. सौदी अरेबियाच्या तेल कंपनीला रिलायन्स ऑईल आणि केमिकल व्यवसायाचा 20% हिस्सा विकल्यानंतर मुकेश अंबानी यांची एकूण मालमत्ता सुमारे 75 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली आहे. त्यामुळे आपल्या नव्या कंपनीद्वारे अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला टक्कर देण्यासाठी मुकेश अंबानी सज्ज झाले आहेत.

मुकेश अंबानी यांची येत्या काही वर्षांत ई-कॉमर्स क्षेत्रात गुंतवणूक करण्याची योजना आहे. सोबतच आपल्या इतर कंपन्यांना कर्जमुक्त करण्याची योजनाही त्यांनी आखली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या म्हणण्यानुसार, मुकेश अंबानी डिजिटल व्यवसायासाठी एक सहाय्यक कंपनी स्थापित करतील. ही कंपनी ग्राहकांना डिजिटल सेवा प्रदान करेल आणि सोबतच रिलायन्स जिओचे सर्व ऑपरेशन कर्ज फेडून टाकेल. जिओ कंपनीचे आर्थिक अधिकारी व्ही. श्रीकांत यांनी सांगितले होते की, 30 सप्टेंबर 2019 रोजी जिओवर सुमारे 84 हजार कोटींचे कर्ज होते, तर या वर्षाच्या सप्टेंबरच्या तिमाहीत जिओचा नफा 990 कोटी होता आणि एकूण महसूल 12,354 कोटी रुपये होता.

(हेही वाचा: Forbes Rich List 2019: मुकेश अंबानी सलग 12 वेळा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; पाहा टॉप 10 श्रीमंतांची यादी)

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी 1,08,000 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीला परवानगी दिली आहे. कंपनीचे लायबिलिटी ट्रांसफर जिओला कर्जमुक्त कंपनी बनविण्यात मदत करेल. या नवीन कंपनीसाठी 1 एप्रिल 2020 पर्यंत अंतिम मुदत निश्चित केली गेली आहे.