Mukesh Ambani | File Image | (Photo Credits: PTI)

रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी दुबईच्या (Dubai) पाम जुमेरा (Palm Jumeirah) बेटावर तब्बल $163 दशलक्ष (अंदाजे 1,349.60 कोटी) मध्ये एक भव्य वाडा खरेदी केला आहे. या प्रकरणाशी परिचित असलेल्या लोकांनी त्यांची नाव न सांगण्याच्या अटीवर याबाबत माहिती दिली. ब्लूमबर्गने अहवालानुसार, अंबानी यांनी गेल्या आठवड्यात कुवैती टायकून मोहम्मद अलशाया यांच्या कुटुंबाकडून ही हवेली विकत घेतली.

अलशाया यांच्या व्यवसाय समूहाकडे Starbucks, H&M आणि Victoria's Secret सारख्या किरकोळ ब्रँडसाठी स्थानिक फ्रेंचायझी आहेत. सध्या अंबानी हे भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि त्यांची संपत्ती $84 अब्ज आहे. त्यांची ही नवीन खरेदी केलेली हवेली, त्यांनी या वर्षी त्यांचा धाकटा मुलगा अनंतसाठी खरेदी केलेल्या $80 दशलक्ष घरापासून काही अंतरावरच आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने खरेदी केलेली ती मालमत्ता खाजगी स्पा, इनडोअर आणि आउटडोअर पूलसह दहा बेडरूमचे आलिशान निवासस्थान आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला अतिश्रीमंत अशा पाम जुमेराह येथील अजून एक घर $82 दशलक्षमध्ये विकत घेतले गेले. Casa Del Sole मध्ये आठ बेडरूम आणि 18 बाथरूम आहेत. तळघरात व्यायामशाळा, चित्रपटगृह, बॉलिंग अ‍ॅली, जकूझी आणि 15 कार पार्किंगची सुविधा आहे. या घराचा सौदा होईपर्यंत मुकेश अंबानी यांनी अनंतसाठी विकत घेतलेले घर हे दुबईमधील सर्वात महागडे घर होते.

आता दुबई लँड डिपार्टमेंटने पुष्टी केली की, एका मालमत्ता $163 दशलक्षमध्ये विकली गेली आहे, परंतु त्यांनी खरेदीदाराची ओळख उघड केली नाही. मात्र अहवालानुसार हे खरेदीदार मुकेश अंबानी आहेत. या नवीन खरेदीवरून हे स्पष्ट होते की, अंबानी दुबईत आपली उपस्थिती वाढवत आहेत. गेल्या वर्षी, रिलायन्सने $79 दशलक्ष खर्च करून आयकॉनिक यूके कंट्री क्लब स्टोक पार्क विकत घेतला होता, असे ब्लूमबर्ग अहवालात म्हटले आहे. (हेही वाचा: PMSBY: प्रतिवर्षी केवळ 20 रूपये भरून मिळू शकतो 2 लाख रूपयांपर्यंतचा दुर्घटना विमा; गरीब व्यक्तीच्या देखील आवाक्यात सरकारी स्कीम)

दरम्यान, कोविड-19 साथीच्या आजारानंतर दुबईमधील प्रॉपर्टी मार्केट मंदीतून सावरत आहे. शहरात जगातील प्रभावशाली व्यावसायिक लोक मालमत्ता खरेदी करत आहेत. यूएईच्या लोकसंख्येपैकी 80 टक्के लोक हे विदेशी रहिवासी आहेत आणि ते देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहेत. दुबई रिअल इस्टेटच्या सर्वाधिक खरेदीदारांमध्ये भारतीयांचा क्रमांक लागतो. अहवालानुसार, यूएईच्या मालमत्तेच्या किमती गेल्या वर्षभरात 70 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत.