MPs With Criminal Charges: काही दिवसांपूर्वी देशातील 18व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, त्यानंतर नव्या एनडीए सरकारचा शपथविधीदेखील पार पडला. प्रत्येक लोकसभा निवडणुकीप्रमाणेच 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीतही गुन्हेगारी पार्श्वभूमी (Criminal Backgrounds) असलेले उमेदवार खासदार म्हणून निवडणून आल्याचे दिसले. लोकसभा 2024 च्या निवडणुकीतील 543 विजयी उमेदवारांपैकी 251 म्हणजे 46 टक्के नवनिर्वाचित खासदारांवर गुन्हेगारी प्रकरणे आहेत. यापैकी 170 (31%) विजयी उमेदवारांवर बलात्कार, खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि महिलांवरील गुन्ह्यांसह गंभीर गुन्हे दाखल आहेत.
याव्यतिरिक्त, 4 उमेदवारांवर भारतीय दंड संहिता कलम 302 अंतर्गत खुनाशी संबंधित आरोप आहेत. या यादीत महाराष्ट्रातील साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांचे नावही सामील आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) नुसार, 27 विजयी उमेदवारांवर खुनाच्या प्रयत्नाचे (कलम 307) गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील तीन खासदार आहेत- सातारा (भाजप), सोलापूर (काँग्रेस) आणि उस्मानाबाद (शिवसेना यूबीटी).
मागील निवडणुकीतील आकडेवारीची तुलना केल्यास, 2019 मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान, 233 (43%) खासदारांवर गुन्हेगारी खटले होते. 2014 मध्ये, 185 (34%) खासदारांवर फौजदारी खटले होते, तर 2009 मध्ये, 162 (30%) खासदारांवर फौजदारी खटले होते. आता 2009 पासून 2024 पर्यंत गुन्हेगारी प्रकरणे असलेल्या खासदारांच्या संख्येत 55% वाढ झाली आहे.
केरळमध्ये सर्वाधिक 90% गुन्हेगारी खटले असलेले विजयी उमेदवार आहेत, तर तेलंगणामध्ये सर्वाधिक 71% विजयी उमेदवारांवर गंभीर गुन्हेगारी प्रकरणे दाखल आहेत. छत्तीसगडमध्ये विजयी उमेदवारांवर सर्वात कमी- 9% गुन्हेगारी खटले आणि 5% गंभीर गुन्हेगारी प्रकरणे आहेत. महाराष्ट्रात नवीन विजयी उमेदवारांपैकी 50 टक्के खासाफारांवर गुन्हेगारी खटले दाखल आहेत. (हेही वाचा: Giorgia Meloni Greets PM Modi: इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी G7 शिखर परिषदेच्या ठिकाणी 'नमस्ते' म्हणत केलं पंतप्रधान मोदींचे स्वागत)
लोकसभा 2024 मध्ये गुन्हेगारी खटले असलेले पक्षनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- 240 विजयी उमेदवारांपैकी 94 (39%) भाजपचे, 99 पैकी 49 (49%) काँग्रेसचे, 37 पैकी 21 (57%) समाजवादी पक्षाकडून, तृणमूल काँग्रेसकडून 29 पैकी 13 (45%), द्रविड मुनेत्र कळघममधून 22 पैकी 13 (59%), तेलगू देसम पक्ष (टीडीपी) मधून 16 पैकी 8 (50%), आणि शिवसेनेच्या (शिंदे) 7 पैकी 5 (71%) यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल आहेत.