आपल्या मुलीचे लग्न थाटामाटात व्हावे असे प्रत्येक आईचे स्वप्न असते. मुलगी जन्माला आल्यापासून आई-वडील तिच्या लग्नाची स्वप्ने पाहत असतात. परंतु देवभूमी उत्तराखंडच्या (Uttarakhand) हरिद्वार जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथे एक आई आपल्या मुलीच्या लग्नाच्या अवघ्या 10 दिवसांपूर्वी प्रियकरासह पळून गेली आहे. एवढेच नाही तर, मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले दागिने आणि पैसेही घेऊन ती निघून गेली आहे.
हे विचित्र प्रकरण हरिद्वारच्या मंगलोर कोतवाली भागातील आहे. इथे 38 वर्षीय वैशाली (नाव बदलले आहे) आपल्या प्रियकरासह पळून गेल्याने खळबळ उडाली आहे. परिसरातील प्रत्येकजण याबाबत चर्चा करत आहे, कारण आपल्या मुलीचे लग्न होण्याच्या अवघ्या 10 दिवसांआधी ती पळून गेली आहे. ज्या तरुणासोबत ही महिला पळून गेली आहे, तो महिलेसोबतच काम करतो. वैशाली पळून गेल्याचे लक्षात येताच मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला. तर दुसरीकडे लग्न होणार असलेल्या मुलीची रडून रडून अवस्था खराब झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या पतीचा वर्षभरापूर्वी मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. ती आपल्या चार मुलांसह राहत होती. ज्यामध्ये त्यांना एक मुलगा आणि तीन मुली आहेत. महिलेच्या मोठ्या मुलीचे लग्न 14 डिसेंबरला होणार आहे. घरात लग्नाची तयारी जोरात सुरू होती. आजूबाजूला लग्नपत्रिकाही वाटण्यात आल्या आहेत. काही खास पाहुणे ये-जा करू लागले होते. मात्र शनिवारी रात्री ही महिला प्रियकरासह पळून गेल्याने सर्वांनाच धक्का बसला. (हेही वाचा: पती दारूच्या नशेत पडला विहिरीत, कलियुगातील सावित्रीने नवऱ्याचा जीव मृत्यूच्या मुखातून आणला परत)
या प्रकरणाचा तपास करत असलेले मंगलोर कोतवालीचे एसएचओ राजीव रौथन यांनी सांगितले की, कुटुंबीयांच्या तक्रारीवरून जेव्हा महिलेच्या प्रियकराचा शोध घेतला गेला, तेव्हा तोही त्याच दिवसापासून बेपत्ता असल्याचे दिसून आले. दोघेही एकाच कंपनीत एकत्र काम करतात. ठिकठिकाणी दोघांचे फोटो लावून त्यांचा तपास सुरू करण्यात आला आहे. घरातील दागिने आणि पैसे घेऊन वैशाली पळून गेल्याने तिने प्रियकराशी लग्न केल्याची भीती कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.