Maharashtra Monsoon 2020 | Image Used For Representative Purpose | Photo Credits: unsplash.com

यंदा देशासह राज्यात दमदार पाऊस झाला. मागील 2 दिवसांतही राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, 28 सप्टेंबर पासून देशात परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह परतीचा पाऊस बरसेल. त्याचबरोबर सोसाट्याचा वाराही सुटेल. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ही माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक (Dy Director General of Meteorology) के.एस.होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. परतीच्या पावसात जीवित आणि वित्तहानी होऊ शकते. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

वीजेपासून संरक्षण कसे करायचे, हे सांगणारा व्हिडिओ देखील होसाळीकर यांनी ट्विटमध्ये जोडला आहे. यंदा देशात समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार यंदा अपेक्षित पाऊस झाला. त्यामुळे जलसाठ्यात वाढ झाली असली तरी अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती उद्भवली. (Mumbai Rains Funny Memes: जोरदार मेघगर्जना, वीजांच्या गडगडाटाने मुंबईकरांनी पहाट झाल्यानंतर सोशल मीडियात मजेशीर मीम्स व्हायरल)

K. S. Hosalikar Tweet:

महाराष्ट्रात मुंबईसह उपगनरांत, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांना पावसाने चांगलेच झोडपून काढले. तसंच पश्चिम महाराष्ट्र, मराठावाडा, विदर्भ येथीही पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे अनेक घरांचे, इमारतींचे नुकसान झाले. जागोजागी पाणी साचल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले. वीज कोसळून मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आल्या. दरम्यान, मागील 2 दिवसांत मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाने रस्ते, रेल्वेमार्ग जलमय झाले. नाट्यगृहं, हॉस्पिटल्समध्ये पाणी शिरले. अशीच परिस्थिती ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसातही उद्भवली होती. त्यामुळे परतीच्या पावसामुळे नुकसान होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.