Mobile Phone Blast: कानपूरमध्ये इअरफोनसह आणि विना हेल्मेट स्कूटर चालवत असताना मोबाईल फोनचा स्फोट; महिलेचा मृत्यू
Representational Image (File Photo)

Mobile Phone Blast: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये (Kanpur) स्कूटरवरून जात असताना खिशात मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. खिशातील मोबाईलचा स्फोट झाल्याने महिलेचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले, त्यामुळे ती रस्त्यावरील दुभाजकावर जाऊन आदळली. त्यानंतर महिला स्कूटरवरून रस्त्यावर पडली. गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. तेथे उभ्या असलेल्या लोकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी महिलेला रुग्णालयात नेले मात्र येथे तिला मृत घोषित करण्यात आले. ही घटना चौबेपूर येथील मानपूर गावासमोरील पेट्रोल पंपाजवळ घडली.

अहवालानुसार, फर्रुखाबाद जिल्ह्यातील नहरैया गावातील रहिवासी योगेंद्र यांची 28 वर्षीय पत्नी पूजा बुधवारी सकाळी 10 वाजता स्कूटीवरून कानपूरला जात होती. तिला कानपूर सेंट्रल स्टेशनवरून मुंबईला जाण्यासाठी ट्रेन पकडायची होती. कानपूर-अलिगड महामार्गावरील चौबेपूर पोलीस स्टेशन हद्दीतील मानपूर गावाजवळील पेट्रोल पंपासमोर दुपारी दोन वाजता तिच्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला. स्फोट होताच भरधाव वेगाने जाणारी स्कूटर नियंत्रणाबाहेर जाऊन दुभाजकाला धडकून पडली.

त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना पाचारण केले. तपासणीवेळी पोलिसांना महिलेचे आधार कार्ड सापडले, ज्यावरून तिची ओळख पटू शकली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली होती. पोलिसांनी महिलेला सामुदायिक आरोग्य केंद्रात पाठवले, मात्र येथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर पोलिसांनी स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधला व त्यांच्याद्वारे महिलेच्या कुटुंबीयांना अपघाताची माहिती देण्यात आली. घटनास्थळी उपस्थित लोकांनी सांगितले की, महिलेच्या डोक्यावर हेल्मेट नव्हते आणि तिच्या कानात एअर बड होते. (हेही वाचा: Bihar Fire News : लग्नघरात फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे सिलिंडरचा स्फोट; ६ जण जखमी)

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईलचा स्फोट झाल्याने हा अपघात झाला. हेल्मेट नसल्यामुळे गाडी दुभाजकावर आदळल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने तिचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. पडल्यामुळे मोबाईल नक्कीच खराब झाला, पण स्फोट होण्यासारखे काही नाही. सध्या तपास सुरू आहे.