Mini Taj Mahal in Tamil Nadu: चेन्नईच्या उद्योगपतीने आपल्या दिवंगत आईच्या स्मरणार्थ बांधला मिनी ताजमहाल; जाणून घ्या किती खर्च आला
Mini Taj Mahal in Tamil Nadu (Photo Credit Twitter)

मुघल सम्राट शाहजहानने आपली प्रिय पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ ताजमहाल (Taj Mahal) बांधला. तेव्हापासून ही वास्तू प्रेमाचे प्रतीक मानली जाते. गेल्या काही वर्षांत, आपण अनेक लोकांनी आपल्या मैत्रिणीसाठी किंवा पत्नीसाठी ताजमहालची प्रतिकृती बनवल्याचे ऐकले आहे. आता तामिळनाडूतील (Tamil Nadu) एका व्यक्तीनेदेखील ताजमहाल सारखीच इमारत बांधली आहे, पण त्याने ही इमारत आपली पत्नी किंवा प्रेयसीसाठी नाही तर आपल्या आईसाठी बांधली आहे.

आईसाठी बांधलेल्या या ताजमहालसदृश इमारतीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या वास्तूला दुसरा 'ताजमहाल' किंवा मिनी ताजमहाल असेही म्हटले जात आहे. 2020 मध्ये अमरुद्दीन नावाच्या या व्यक्तीच्या आईचे निधन झाले. आईने आपल्या मुलांसाठी कोट्यवधी रुपये मागे ठेवले होते, परंतु तिच्या मुलांनी ते पैसे घेण्यास नकार दिला आणि तिचे सर्व पैसे तिच्या स्मरणार्थ बांधलेल्या इमारतीत खर्च केले. ही इमारत आता पूर्ण झाली आहे.

तामिळनाडूतील तिरुवरूर जिल्ह्यातील अमरुद्दीन शेख यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ हा ताजमहाल बांधला आहे. आजारपणामुळे त्यांची आई जैलानी बीवी यांनी 2020 मध्ये या जगाचा निरोप घेतला. अमरुद्दीन यांनी मीडियाला सांगितले की, त्यांची आई त्याच्यासाठी सर्वस्व होती, त्यामुळे तिचा मृत्यू त्यांच्यासाठी मोठा धक्का होता. अमरुद्दीनच्या वडिलांचे 1989 मध्ये निधन झाले, तेव्हापासून त्यांच्या आईने संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतली होती. (हेही वाचा: देशात 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत मुंबई, अहमदाबाद, पुणे, बेंगळुरूसह 43 शहरांमधील रिअल इस्टेटच्या किंमतीमध्ये वाढ- NHB Data)

अमरुद्दीन म्हणाले की, जेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा त्यांची आई फक्त 30 वर्षांची होती. इतक्या लहान वयात विधवा होऊनही त्यांच्या आईने दुसरे लग्न केले नाही. आता जेव्हा 2020 मध्ये त्यांच्या आईचा मृत्यू झाला तेव्हा अमरुद्दीन यांनी आपल्या आईला सामान्य स्मशानभूमीत दफन करण्याऐवजी स्वतःच्या जमिनीमध्ये दफन करण्याचा निर्णय घेतला. ज्या ठिकाणी अमरुद्दीन यांनी आपल्या आईला दफन केले होते, त्याच ठिकाणी आता त्यांनी ताजमहालची प्रतिकृती बांधली आहे.

हा ताजमहाल एका बिल्डरच्या मदतीने दोन वर्षांत बांधला गेला आहे. तो तयार करण्यासाठी सुमारे 5.5 कोटी रुपये खर्च झाले आहेत. अमरुद्दीनने सांगितले की, त्याच्या आईने मागे 5-6 कोटी रुपये सोडले होते. आता हा पैसा आणि जमीन ट्रस्टच्या नावावर हस्तांतरित करण्यात आली आहे. आज तकच्या रिपोर्टनुसार, ही ताजमहालसारखी इमारत एक एकरमध्ये पसरलेल्या 8000 स्क्वेअर फूट जागेत बांधली गेली आहे. येथे अमरुद्दीनच्या आईच्या स्मारकाशिवाय मुस्लिमांसाठी नमाज अदा करण्यासाठीही जागा तयार करण्यात आली आहे. या इमारतीत मुलांसाठी मदरसा वर्गही भरवले जात आहेत. अमरुद्दीन म्हणाले की, कोणत्याही जाती किंवा धर्माची व्यक्ती या इमारतीत प्रवेश करू शकते.