Photo Credit- Pixabay

Mumbai Crime: ड्रींक अँड ड्राइव्ह प्रकरणात तपासणी टाळण्यासाठी कार बॅरिकेड्समध्ये घुसवणाऱ्या आणि इतर वाहनांना धडकणाऱ्या 32 वर्षीय व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने शनिवारी दिली. अंधेरी (पश्चिम) येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर पहाटेच्या सुमारास घडलेल्या घटनेबद्दल वरळी येथील रहिवासी असलेल्या व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केली आहे. सभ्यसाची देवप्रिया निशंक असे आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mumbai Mega Block Updates: रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक; पश्चिम मार्गावर काय असेल स्थिती? वाचा सविस्तर)

सभ्यसाची देवप्रिया निशंक हे मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होते. त्याची कार पश्चिम द्रुतगती महामार्गावर येताच तेथे पोलिसांचे पथक तपासणी करत होते. आरोपीने गोखले पुलावरील बॅरिकेड्समध्ये घुसून तपासणी टाळण्याच्या प्रयत्नात अन्य तीन वाहनांना धडक दिली. कारमध्ये बसलेल्या एका महिलेनेही मद्य प्राशन केले होते. घटनास्थळावरील पोलीस कर्मचारी, दुचाकीस्वार होते. त्यांनी कारचा पाठलाग केला. आरोपीला त्याची कार थांबवण्यास भाग पाडले आणि कारचा दरवाजा उघडण्यास नकार दिल्याने पोलिसांना त्याची काच फोडावी लागली.

घटनास्थळी जमा झालेल्या जमावाने त्याला बेदम मारहाण केली. आरोपीला हॉस्पिटलमध्ये आणि नंतर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.