Maneka Gandhi’s Cow Remarks: खासदार मनेका गांधी यांच्या अडचणीत वाढ; ISKCON पाठवणार 100 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस, जाणून घ्या प्रकरण (Video)
मनेका गांधी (Photo Credit: PTI)

उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील भारतीय जनता पक्षाच्या खासदार मनेका गांधी (BJP MP Maneka Gandhi) या त्यांच्या इस्कॉनविरोधात (ISKCON) केलेल्या वक्तव्यामुळे मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत. मनेका गांधी यांनी आरोप केला आहे की, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना (इस्कॉन) च्या गोशाळेतील गायी कसाईंना विकल्या जातात. गांधी यांच्या वक्त्यव्यामुळे त्यांच्यावर आता टीका व्हायला सुरुवात झाली आहे. इस्कॉन व्यवस्थापनही त्यांच्या या वक्तव्यामुळे संतप्त झाले आहे. या संदर्भात गांधी यांच्यावर 100 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस बजावण्यात आली आहे.

मनेका गांधी यांचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये त्या इस्कॉनला देशातील सर्वात मोठा घोटाळेबाज म्हणताना दिसत होत्या. त्यांनी म्हटले आहे की, इस्कॉन आपल्या गोठ्यातील गायी कसाईंना विकते. मनेका गांधी यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.

मनेका गांधी यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इस्कॉनने सर्व आरोप फेटाळून लावले. या संदर्भात एक पत्र जारी करून इस्कॉनने म्हटले आहे की, ही संस्था केवळ भारतातच नाही तर जगभरात गायी आणि बैलांचे संरक्षण आणि निगा राखण्यात गुंतलेली आहे. येथे गायी-बैलांची आयुष्यभर सेवा केली जाते. इथल्या गायी कसायाला विकल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे.

मनेका गांधी यांच्या या दाव्यावर इस्कॉनने नाराजी व्यक्त केली आहे. संघटनेच्या वतीने खासदारांना बदनामीची नोटीस पाठवण्यात आली आहे. इस्कॉन कोलकाता उपाध्यक्ष राधारमण दास यांनी भाजप खासदार मनेका गांधी यांची ही टिप्पणी अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्याने जगभरातील आमचे भक्त दुखावले आहेत व आता इस्कॉन 100 कोटी रुपयांच्या मानहानीच्या दाव्यासह त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे दास म्हणाले. (हेही वाचा: Noida Petrol Pump Fight Video: नोएडात गुंडगिरी, पेट्रोलपंपवर तरुणाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद)

राधारमण दास पुढे म्हणाले, ‘आम्ही मनेका गांधी यांना नोटीस पाठवली आहे. एक एक खासदार, माजी केंद्रीय मंत्री एवढ्या मोठ्या सोसायटीविरुद्ध पुराव्याशिवाय खोटे कसे काय बोलू शकतात? त्या म्हणतात की मी इस्कॉनच्या अनंतपुर येथील गोशाळेत गेले होते, मात्र तिथल्या भक्तांनी गांधी तिथे आल्या नसल्याचे सांगितले.’ दरम्यान, मनेका यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी आधी हल्लाबोल केला. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मनेका गांधी यांचे वक्तव्य एका मोठ्या कटाचा भाग असल्याचे वर्णन केले.