कारच्या बोनेटला लटकलेल्या पीडित व्यक्तीसह कारचालकाचा 2 किलोमीटरचा प्रवास (Viral Video)
Delhi Man Drags Cab Driver for 2 Kilometres in Ghaziabad (Photo Credits: ANI)

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून एक भयंकर प्रकार समोर येत आहे. एका गाडीच्या बोनेटला एक माणूस लटकला असताना कार चालकाने चक्क 2 किलोमीटरचा प्रवास केला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. कारला लटकलेल्या पीडित व्यक्तीचे नाव वरभान सिंग (Verrbhan Singh) असून तो गौतम बुद्ध नगरचा (Gautam Budh Nagar) रहिवासी आहे. तर कारचालक आरोपीचे नाव रोहन मित्तल (Rohan Mittal) असून तो दिल्लीचा (Delhi) रहिवासी आहे.

या घटनेचा व्हिडिओ एएनआय (ANI) ने शेअर केला आहे. पीडित व्यक्तीने कार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र कारचालकाने त्याकडे दुर्लक्ष केले आणि कार चालवणे सुरुच ठेवले.

हाती आलेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार काल (बुधवार, 6 मार्च) घडला आहे. काल पीडित व्यक्ती नोईडा 62 च्या दिशेने जात होती. तेव्हा ह्युडाई i20 कारने त्याला मागून ठोकर मारली. त्यानंतर पीडित व्यक्तीने मित्तलला (कारचालकाला) कार थांबवण्यास सांगितले. मात्र त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कार थांबवण्यासाठी पीडित व्यक्ती कारसमोर आली आणि कार थांबवण्यास सांगू लागली. मात्र मित्तलने काही ऐकले नाही आणि कार सुरु केली. त्यामुळे पुढील सर्व प्रकार घडला. त्यानंतर ट्रॅफिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मित्तलला अटक केली.

अशा प्रकारची ही पहिलीच घटना नसून यापूर्वीही हरियाणा, गुरुग्राम येथून अशा प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत.