Farmers' protest in Delhi | (Photo Credits: PTI)

Maharashtra Woman Dies in a Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनात महाराष्ट्रातील महिलेचा मृत्यू झाला आहे. सीताबाई रामदास तडवी (Sitabai Tadvi) असे या महिलेचे नाव आहे. त्या 56 वर्षांच्या होत्या. नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील अंबाबरी गावच्या रहिवासी असलेल्या सीताबाई या 16 जानेवारीपासून दिल्लीच्या सीमेवर शहाजान येथे आंदोलनाला बसल्या होत्या. कडाक्याच्या थंडीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. (Maharashtra Woman Died During Delhi Farmers Protest).

प्राप्त माहितीनुसार, दिल्लीच्या सीमेवर रक्त गोठवणारी कडाक्याची थंडी आहे. या थंडीमुळे सीताबाई तडवी यांचा मृत्यू झाला. सीताबाई यांना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. सीताबाई यांचे पार्थीव त्यांच्या मूळ गावी (अंबाबरी) येथे आणण्यात येणार आहे. इथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

दिल्ली आणि आदोलन सुरु असलेल्या ठिकाणी प्रचंड प्रमाणावर थंडी पडली आहे. तापमानाचा पारा भलताच घसरला असून, गुरुवारी सकाळी या ठिकाणी 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अशाच प्रकारचे तापमान पुढेचे दोन ते तीन दिवस राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

केंद्र सरकारने संमत केलेले 3 कृषी कायदे रद्द करावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीसाठी देशभरातील शेतकरी दिल्लीच्या सिमेवर (प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणा येथील शेतकरी) गेले 2 महिने आंदोलन करत आहेत. आंदोलन आणि कृषी कायद्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यात 12 वेळा चर्चा झाली. परंतू, सर्वच्या सर्व चर्चेच्या फेऱ्या अयशस्वी झाल्या आहेत.

दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांनी शक्तीप्रदर्शन करण्यासाठी प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्ली येथे ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला हिंसक वळण लागले. या घटनेत काही आंदोलक शेतकरी आणि काही पोलीस कर्मचारी जखमी झाले. या हिंसाचारात आतापर्यंत 37 नेत्यांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. तर ,19 जणांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. या सर्व प्रकारानंतर आता आंदोलनाचे पुढे काय होणार याबाबत उत्सुकता आहे.