Results | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

जुनी पेंशन लागू करण्याच्या मागणी वरून संपावर गेलेल्या शासकीय- निम शासकीय कर्मचार्‍यांनी आता संप मागे घेतला आहे. या संपामध्ये शिक्षकांचा देखील समावेश असल्याने यंदा बोर्डाचे निकाल रखडणार का? अशी चिंता व्यक्त केली जात होती. संप काळात बोर्डाच्या परीक्षा तर सुरळीत सुरू होत्या पण झालेले पेपर तपासणीचं काम बंद होतं. यामुळे दहावी बारावीच्या सुमारे 10 लाख उत्तरपत्रिका मूल्यांकनाविना पडून राहिल्या होत्या. शिक्षकांनी उत्तर पत्रिकांचे गठ्ठे न तपासताच परत पाठवले होते. पण आता ही चिंता दूर होण्याची शक्यता आहे. कारण पेपर तपासणीचं काम आता सुरू झालं आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागात 15 लाख उत्तरपत्रिका न तपासल्याने पडून राहिल्या होत्या. राज्यात 12वीची परीक्षा पार पडली आहे. दहावीचे अजून 2 पेपर बाकी आहेत. त्यामुळे आता शिक्षक वेळेत पेपर तपासणीचं काम पूर्ण करू शकतील असा अंदाज आहे. सध्या बोर्डाकडून उत्तरपत्रिका गोळा करण्याचे काम सुरु आहे. तसेच शिक्षकांनी देखील वेळेत उत्तरपत्रिका तपासून देण्याचे आश्वासन बोर्डाला दिले आहे त्यामुळे यंदा 10वी,12वीचा निकाल वेळेत लागेल असा विश्वास विभागीय मंडळातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याचं एबीपी माझाच्या वृत्तामध्ये सांगण्यात आलं आहे.

दहावी, बारावीच्या परीक्षा या विद्यार्थ्यांच्या करियरच्या दृष्टीने निर्णयक असतात. बारावी नंतर काय? या प्रश्नाचं उत्तर अनेक जण या बोर्ड परीक्षेच्या निकालावर घेतात. उच्च शिक्षण, परदेशी शिक्षण असे अनेक पर्याय 10वी 12वीच्या निकालानंतर घेतात. मागील वर्षी दहावीचा निकाल 17 जून 2022 दिवशी तर बारावीचा निकाल 10 जून 2022 दिवशी ऑनलाईन जाहीर करण्यात आला होता. यंदा कोविड संकटानंतर पहिल्यांदाच कोणत्याही निर्बंधांविना बोर्ड परीक्षा पार पडल्या आहेत. त्यामुळे निकाल वेळेत लावण्याचं आव्हान बोर्डासमोर असणार आहे.  राज्यात 9 विभागीय मंडळांचे एकत्र निकाल जाहीर केले जातात.