Madhya Pradesh Assembly & Supreme Court (Photo Credits: ANI)

मध्य प्रदेश (Madhya Pradesh)  मध्ये सुरु असणाऱ्या राजकीय सत्ता नाट्यात आता आणखीन एक नवा ट्विस्ट आला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे (Coronavirus)  विधानसभा अर्थसंकल्प अधिवेशन (Vidhansabha Budget Session) हे 26 मार्च पर्यंत स्थगित करण्यात आले आहे, त्यामुळे परिणामी मुख्यमंत्री कमलनाथ (CM Kamalnath) यांच्या सरकारची बहुमत चाचणी देखील पुढे ढकलली गेली आहे. या एकूण प्रकरणाच्या विरुद्ध आता भाजप (BJP) कडून धाव घेण्यात आली असून त्वरित बहुमत चाचणी (Floor Test) घेण्यात यावी अशी याचिका दाखल करण्यात आली आहे.. आजच्या दिवसाचे क्षणोक्षणीचे अपडेट्स जाणून घ्या एका क्लिक वर

प्राप्त माहितीनुसार, काँग्रेसचे आमदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत कमलनाथ सरकारला मोठा धक्का दिला होता, सिंधिया यांच्या सोबत अन्य 22 आमदारांनी सुद्धा आपले राजीनामे दिले होते, यामुळे साहजिकच कमलनाथ यांच्या सरकारकडे बहुमत आहे का यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते, याच पार्श्वभूमीवर राज्यपाल लालजी टंडन यांच्याकडून सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले गेले होते, आजच्या अधिवेशनातच हे बहुमत सिद्ध केले जावे अशी मागणीही विरोधी पक्ष भाजपकडून केली जात होती, मात्र कोरोनाच्या भीतीने आमदारांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन संपूर्ण अधिवेशनच पुढे धावण्यात आले आहे, ज्यामुळे ही फ्लोअर टेस्ट सुद्धा आता लांबणीवर पडली आहे.

ANI ट्विट

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारला आपल्याकडील बहुमत आज अर्थसंकल्प अधिवेशनाच्या सुरुवातीला सिद्ध करण्यास सांगितले होते, वाटल्यास आमदारांना हात उंचावून पाठिंबा जाहीर करायला सांगा अशा आशयाचे पत्र सुद्धा टंडन यांनी कमलनाथ यांना लिहिले होते, मात्र दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष एन. पी. प्रजापती यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून याबाबत निर्णय आज अधिवेशनात घेतला जाईल असे सांगितले होते.

दरम्यान, आता अधिवेशन पुढे ढकलले गेल्याने काँग्रेसला काही अधिक काळ आपल्या बंडखोर आणि नाराज आमदारांना समजवण्यासाठी मिळणार आहे. 26 मार्च पर्यंत या सर्व आमदारांची मनधरणी केल्यास बहुमत सिद्ध करणे कमलनाथ यांच्या सरकारसाठी सोप्पे होऊ शकते.