LPG Gas Cylinder Price Hiked: एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये महिन्याभरात दुसर्‍यांदा वाढ; जाणून घ्या नवे दर!
LPG Cylinder | (Photo Credits: PTI)

घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये (Domestic LPG Cylinder Price) आता पुन्हा दरवाढ झाली आहे. देशात 14.2 किलोच्या गॅस सिलेंडरची किंमत 999.50 वरून आता 1003 रूपये झाली आहे. घरगुती एलपीजी प्रमाणे कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत देखील 8 रूपयांनी वाढली आहे. एप्रिल 2021 पासून सिलेंडरची किंमत आतापर्यंत तब्बल 190 रूपयांनी वाढली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत्या इंधनदराचा परिणाम देशात गॅस सिलेंडरच्या किंमतींवर होत असतो. त्यामुळे मे महिन्यात दुसर्‍यांदा गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये ही दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता देशात सार्‍याच राज्यांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती 1000 रूपयांच्या पार गेल्या आहेत. एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत कोलकातामध्ये 1029 रुपये आणि चेन्नईमध्ये 1018.5 रुपयांवर पोहोचली आहे. दिल्ल्लीत 1003 रूपये मोजावे लागणार आहेत तर मुंबई शहरामध्ये 1002.50 रुपये प्रति सिलेंडर किंमत झाली आहे.

सध्या सरकार बहुतेक शहरांमध्ये एलपीजीवर कोणतेही अनुदान देत नाही आणि बहुचर्चित उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत कनेक्शन घेतलेल्या गरीब महिलांसह ग्राहकांना गॅस सिलेंडर रिफिलची किंमत विनाअनुदानित किंवा बाजारभाव एलपीजी सारखीच मोजावी लागत आहे. नक्की वाचा: Inflation: जानेवारी 2014 पासून आतापर्यंत महागाई 70% वाढली; 20 वर्षात 23 रुपयांची थाळी 78 रुपयांवर पोहोचली .

भारत त्याच्या तेलाच्या गरजेपैकी 85 टक्के गरजेची पूर्तता करण्यासाठी परदेशातील खरेदीवर अवलंबून आहे, ज्यामुळे ते आशियातील उच्च तेलाच्या किमतींसाठी सर्वात असुरक्षित आहे. भारत जगातील तिसरा सर्वात मोठा तेल ग्राहक आणि आयातदार देश आहे.