11 महिलांचा शबरीमला मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न, भाविकांचा विरोध कायम, 27 डिसेंबरपर्यंत संचारबंदी
Sabarimala Temple Row (Photo Credits: IANS)

Sabarimala Temple Row: केरळच्या शबरीमला मंदिर (SabarimalaTemple) परिसरामध्ये महिलांना प्रवेश देण्यावरून पुन्हा वाद रंगायला सुरुवात झाली आहे. आज रविवारी सकाळी 50 वयापेक्षा कमी असलेल्या 11 महिला दर्शनासाठी मंदिरात जाण्याचा प्रयत्न करत होत्या. मदुराईहुन त्यांनी चालत पुढे जाण्याचा पर्याय निवडला मात्र 5 किमी भागातच भाविकांनी त्यांना मज्जाव केल्याने त्यांना मंदिरात जाताच आले नाही. मंदिर परिसरात विरोध प्रदर्शन सुरु असल्याने पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दर्शनासाठी आलेल्या महिला या चैन्नईच्या ‘मानिथि’ संघटनेच्या सदस्य आहेत. मंदिरात प्रवेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही. अशी त्यांची भूमिका आहे. महिलांनी दिलेल्या माहिती नुसार, त्या पहाटे ३. ३० वाजल्या पासून आल्या आहेत. पोलीस . त्यांना संरक्षण देतील असे त्यांना सांगण्यात आले होते मात्र आता भाविकांच्या विरोधासमोर पोलीस आम्हांला संरक्षण देत नसल्याचे महिलांनी म्हटलं आहे. तणावपूर्ण परिस्थिती पाहता पथानामथिट्टा जिल्ह्यातील कलम 144 म्हणजेच संचारबंदी 27 डिसेंबरपर्यंत लागू करण्यात आली आहे.