काल फिफा विश्वचषक 2022 (FIFA World Cup 2022) चा शेवटचा सामना खेळला गेला. अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव करत फिफा विश्वचषकावर आपले नाव कोरले. अशाप्रकारे काल संपूर्ण जग एका रोमहर्षक आणि संस्मरणीय सामन्याचे साक्षीदार ठरले. या सामन्यानंतर जगभरातून अर्जेंटिना संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावरही अर्जेंटिनाच्या संघाचे जबरदस्त कौतुक होत आहे. फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीबद्दल (Lionel Messi) तर लोकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. मेस्सीची लोकप्रियता जगभर आहे.
मात्र, आता आसाममधील एका काँग्रेस खासदाराने मेस्सीबाबत केलेल्या विशेष दाव्याने लोक त्यांना ट्रोल करत आहेत. ट्विटरवर मेस्सीचे अभिनंदन करताना आसाम काँग्रेसचे खासदार अब्दुल खलेक (Congress MP Abdul Khaleque) यांनी लिहिले की, ‘तुमचे मनापासून अभिनंदन, तुमच्या आसाम कनेक्शनचा आम्हाला अभिमान आहे.’ यानंतर लोक मेस्सीच्या आसाम कनेक्शनबद्दल काँग्रेस खासदार अब्दुल खलेक यांना प्रश्न विचारू लागले, त्यानंतर त्यांनी दावा केला की अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा जन्म भारताच्या आसाम राज्यात झाला आहे. (हेही वाचा: FIFA World Cup 2022 Final: फुटबॉल उत्सवाला हिंसक वळण, केरळच्या काही भागात पोलिसांना माराहाण)
Member of Parliament from Barpeta Lok Sabha constituency. pic.twitter.com/uFHSgFJ4Dt
— Anshul Saxena (@AskAnshul) December 19, 2022
या ट्वीटनंतर सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया समोर यायला सुरुवात झाली. अनेकांनी कॉंग्रेस खासदारांना ट्रोल केले. सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर काँग्रेस खासदार अब्दुल खलेक यांनी त्यांचे ट्विट डिलीट केले आहे. मात्र त्यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट प्रचंड व्हायरल होत आहे. अशा प्रकारे फिफा विश्वचषकातील विजयानंतर सर्वत्र लिओनेल मेस्सीची वेगवेगळ्या प्रकारे चर्चा सुरु आहे.
दरम्यान, फिफा विश्वचषक 2022 चा अंतिम सामना रविवारी फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात झाला. दोन्ही संघांमधील सामन्यात अर्जेंटिना अंतिम फेरीत विजय मिळवून विश्वविजेता ठरला. पेनल्टी शूट-आऊटमध्ये 4-2 असा विजय मिळवून अर्जेंटिनाने विश्वविजेतेपदावर नाव कोरले. अशाप्रकारे 36 वर्षांची प्रतीक्षा संपली आणि मेस्सीचे स्वप्न पूर्ण झाले. या सामन्याद्वारे अर्जेंटिना तिसऱ्यांदा विश्वविजेता ठरला आहे.