Kashi Vishwanath Temple: पीएम नरेंद्र मोदींच्या आईच्या वजनाइतके सोने काशी विश्वनाथ मंदिराला दान; सुवर्णाने सजले गर्भगृह (See Video)
Kashi Vishwanath Temple. (Photo Credits: Twitter)

वाराणसीचे (Varanasi) काशी विश्वनाथ मंदिर (Kashi Vishwanath Temple) हे देशातील सर्वात सुंदर मंदिरांपैकी एक समजले जात आहे. आता मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंतींवर सोने (Gold) चढवण्यात आले आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या भिंतीवर लावलेले सोने एका भाविकाने दान केले आहे. बातमीनुसार, पीएम मोदींच्या प्रभावाने दक्षिण भारतातील एका भक्ताने मंदिरात सोने दान केले आहे. त्यामुळे काशी विश्वनाथ मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंती आता सोन्याने चमकत आहेत. या भक्ताने पीएम मोदी यांची आई हीराबेन यांच्या वजनाइतके सोने दान केले आहे.

योगायोगाची गोष्ट आहे की मंदिराच्या भिंती सोन्याने मढवल्यानंतर बाबा विश्वनाथ यांच्या अभिषेकासाठी सर्वप्रथम पंतप्रधान मोदीच पोहोचले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तब्बल 40 किलो सोने दान करणाऱ्या या भक्ताचे नाव समोर आलेले नाही. नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी मंदिर प्रशासनाच्या सहकार्याने गर्भगृहात सोन्याचा मुलामा चढवल्याचे वृत्त आहे. मंदिराच्या गर्भगृहात जवळजवळ 40 किलो सोने बसवण्याचे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. आता सुवर्ण शिखराच्या खाली असलेला उर्वरित भाग आणि दरवाजाची चौकट बदलण्यासाठी 24 किलो सोने वापरण्याची योजना आहे. महाशिवरात्रीनंतर हे काम सुरू होणे अपेक्षित आहे.

पीएम मोदींच्या प्रभावाने दक्षिण भारतातील एका भाविकाने तीन महिन्यांपूर्वी मंदिराला भेट दिली होती. मंदिरात पोहोचल्यानंतर गाभाऱ्याच्या भिंतींवर किती सोने बसवले जाणार आहे, याची माहितीही त्यांनी घेतली होती. त्यांनी मंदिर प्रशासनाकडे सोने दान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मंदिर प्रशासनाकडून सोने दान करण्याची परवानगी मिळाल्यानंतर भिंतींवर सोन्याचे माप आणि साचे तयार करण्याची तयारी सुरू करण्यात आली होती. (हेही वाचा: Gold-Silver Rates Today: युक्रेन-रशिया संघर्षात सोन्या-चांदीचे दर वाढले; पहा आजचा भाव)

महिनाभराच्या तयारीनंतर शुक्रवारी गाभाऱ्याच्या भिंतींवर सोने चढवण्याचे काम सुरू करण्यात आले. रविवारीही सोन बसवण्याचे काम सुरूच होते. वृत्तानुसार, मंदिराच्या उर्वरित भागात आणि काशी विश्वनाथ धाममधील गर्भगृहात सोने जडवण्याची योजना आखली जात होती. 1835 मध्ये पंजाबचे तत्कालीन महाराजा रणजित सिंग यांनी बाबा विश्वनाथ मंदिराच्या दोन शिखरांवर सोन्याचा मुलामा चढवला होता. बातमीनुसार, त्यावेळी सुमारे साडेबावीस मण सोने लागले होते.