Karnataka Political Crisis: कर्नाटक राज्याच्या राजकारणात सोमवारी (8 जुलै 2019) मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी (H D Kumaraswamy) यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या मंत्रिमंडळातील काँग्रेसच्या 21 मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. काँग्रेस पक्षाचे विधानसभेतील गटनेते सिद्धारमैया यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षाचे कर्नटक राज्य प्रभारी के सी वेणुगोपाल (K. C. Venugopa) यांनी म्हटले आहे की, सरकार वाचविण्यासाठी आणि भाजपला रोखण्यासाठी आमच्या आमदारांनी मंत्रीपद सोडले आहे. तर, दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी म्हटले आहे की, प्रकरण पूर्ण निवळले आहे. आता सरकारला कोणताच धोका नाही.
दरम्यान, या आधी अपक्ष आमदार एच नागेश यांनीही आपल्या पदाचा राजीनामा देत सरकारचा पाठिंबा मागे घेतला. त्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जर भाजप सरकार बनवत असेल तर मी त्यांच्या सोबत राहिन. दुसऱ्या बाजूला मंत्री जमीर अहमद खान यांनी म्हटले की, 'जेवढे आमदार भाजपच्या गोटात गेले त्यातील 6-7 आमदार आज संध्याकाळपर्यंत परत येतील.' या आधी काँग्रेस आणि जेडीएसच्या 13 आमदारांनी आपल्या विधासभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. (हेही वाचा, कुमारस्वामी यांनी 100 वेळा अंघोळ केली तरीही ते काळ्या म्हशीसारखे दिसतात: भाजप आमदार राजू कागे)
कर्नाटक विधानसभा पक्षीय बलाबल
पार्टी सीट
भाजपा 105
कांग्रेस 078
जेडीएस 037
बसपा 001
केपीजेपी 001
निर्दलीय 001
दरम्यान, जेडीएस नेता आणि मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्याशिवाय काँग्रेसचे विधानसभा गटनेते सिद्धारमैया यांच्यासमोर सरकार बनविण्याचे आव्हान आहे. राज्यात सरकार बनविण्यासाठी आणि वाचविण्यासाठी भाजप आणि जेडीएस यांच्यात बैठकांचा सिलसिला सुरु आहे. सोमवारी उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांनी आपल्या निवासस्थानी काँग्रेस आमदार आणि मंत्र्यांना नाष्ट्यासाठी बोलावले होते. या वेळी माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया मंत्री डीके शिवकुमार, यूटी खादर, शिवशंकरा रेड्डी, वेंकटरमनप्पा, जयमाला, एमबी पाटिल, केबी गौड़ा, राजशेखर पाटिल आदी मंडळी उपस्थित होते.