Nithyananda (File Image)

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे, ज्यामध्ये फरार भारतीय गुरू नित्यानंद (Nithyananda) याने स्थापन केलेला काल्पनिक देश कैलाशाची (Kailasa) महिला प्रतिनिधी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत भाषण देताना दिसत आहे. आता संयुक्त राष्ट्राने या प्रकरणी आपली भूमिका मांडली आहे. जिनेव्हा येथे झालेल्या दोन कार्यक्रमांमधील फरार नित्यानंदच्या प्रतिनिधीच्या शब्दांकडे दुर्लक्ष करणार असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्राच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सभेत चर्चेत असलेल्या विषयांशी कैलाशाच्या प्रतिनिधीचे भाषण अप्रासंगिक होते.

स्वयंभू गॉडमॅन नित्यानंद याच्यावर भारतात बलात्कार आणि लैंगिक हिंसाचाराची प्रकरणे आहेत. नित्यानंद आपल्यावरील आरोप फेटाळत आहे. 2019 मध्ये त्याने युनायटेड स्टेट ऑफ कैलासा (USK) नावाच्या काल्पनिक देशाची स्थापना केल्याची माहिती मिळाली होती. या काल्पनिक देशाच्या प्रतिनिधीचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या दोन कार्यक्रमांमधील भाषण सध्या भारतात चर्चेत आहे. भारत सरकारने या विषयावर अजूनतरी कोणतेही भाष्य केलेले नाही.

यूएनच्या एका अधिकाऱ्याने बीबीसीला ईमेलद्वारे सांगितले की, ‘यूएसकेचे प्रतिनिधी फेब्रुवारीमध्ये जिनिव्हा येथील यूएनच्या दोन कार्यक्रमांना उपस्थित होते. पहिला कार्यक्रम निर्णय प्रक्रियेतील महिलांच्या सहभागाबद्दल होता. महिलांवरील भेदभाव निर्मूलन समितीने (CEDAW) याचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम 22 फेब्रुवारी रोजी झाला. यानंतर, 24 फेब्रुवारी रोजी दुसऱ्या कार्यक्रमासाठी यूएसकेचे प्रतिनिधी बैठकीत सहभागी झाले. त्या बैठकीत विकासाच्या दिशेवर चर्चा करण्यात आली. या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण बैठका आहेत ज्यामध्ये कोणतीही व्यक्ती आपले विचार मांडू शकते.’

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त विवियन क्वोक यांनी सांगितले की, यूएसके प्रतिनिधीचे मत अंतिम अहवालात समाविष्ट केले जाणार नाही कारण, त्यांची मते ज्या विषयावर बैठक होत होती त्या विषयाशी अप्रासंगिक होती. दुसऱ्या बैठकीत व्यक्त केलेले विचारही अंतिम अहवालाचा भाग नसतील.

(हेही वाचा: काल्पनिक देश कैलाशाचा प्रतिनिधींची संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीला उपस्थिती; भारताकडून Nithyananda चा छळ होत असल्याचा दावा)

युनायटेड नेशन्सच्या वेबसाईटवरील व्हिडीओमध्ये दिसत आहे की, विजयप्रिया नित्यानंद नावाची महिला कैलाशाचे प्रतिनिधित्व करत होती. युनायटेड नेशन्समधील 'युनायटेड स्टेट ऑफ कैलास'ची ती कायमस्वरूपी राजदूत असल्याचे तिने सांगितले. नित्यानंद आणि कैलास यांचा भारताकडून होणारा 'छळ' थांबवण्यासाठी कोणती पावले उचलता येतील?, अशा प्रश्न तिने हा बैठकीत उपस्थित केला होता. विजयप्रिया म्हणाली की, ‘यूएसके हा हिंदूंचा पहिला सार्वभौम देश आहे, ज्याची स्थापना नित्यानंद याने केली होती. नित्यानंद हा हिंदू धर्माचा 'सर्वोच्च गुरु' आहे. ‘कैलासा’ हा विकासाच्या दृष्टीने यशस्वी देश आहे कारण तिथे प्रत्येकाला मोफत अन्न, निवारा आणि वैद्यकीय सेवा पुरविली जाते.’